कर्जत : तालुक्यातील कुपोषित बालकांना कुपोषणाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी तालुका स्तरावर दोन सरकारी रुग्णालयात बाल उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. तालुक्यात १६२ कुपोषित बालके असून त्यातील अतितीव्र असलेल्या ४५ कुपोषित बालकांना महिनाभर रुग्णालयात दाखल करून त्यांना सुदृढ केले जाणार आहे. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र तेथे अतिरिक्त पोषण आहार देण्यात येत आहे, परंतु तरी देखील कुपोषण कमी होईल याची खात्री नसल्याने आता अंतिम पर्याय म्हणून बाल उपचार केंद्रे पुढील आठ दिवसांत सुरू केली जाणार आहेत. दरम्यान, कर्जत तहसील कार्यालयाने १० कुपोषित बालके दत्तक घेण्याचा निर्णय तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी जाहीर केला.कुपोषण कमी करण्यासाठी राज्य सरकारने रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यातील दिशा केंद्र या सामाजिक संस्थेला जबाबदारी दिली आहे. दिशा केंद्राने जिल्ह्यातील कुपोषणाची स्थिती प्रशासनापुढे आणल्यानंतर गेली दोन वर्षे बंद असलेली ग्राम बाल उपचार केंद्रे सुरू करण्यासाठी तब्बल ७५ लाख एवढा मोठा निधी दिला आहे. अलिबाग आणि कर्जत अंगणवाडीमध्ये अशी उपचार केंद्रे सुरू झाली आहेत. अलिबागमध्ये १९ तर कर्जत तालुक्यात ५ ठिकाणी अशी केंद्रे सुरू झाली आहेत. कर्जत तालुक्यात कुपोषण असलेल्या तब्बल ८१ अंगणवाडीमध्ये अशी ग्राम बाल उपचार केंद्रे सुरु करण्याचे निर्देश आहेत. मात्र कर्जत तालुक्यातील वाढते कुपोषण लक्षात घेता कुपोषण निर्मूलनासाठी नियोजन करण्यासाठी विशेष बैठक शुक्रवारी ४ नोव्हेंबर रोजी कर्जत पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केली होती. त्यावेळी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी, नायब तहसीलदार एल. के. खटके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे, एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी राजन सांबरे, दिशा केंद्राचे कार्यकारी संचालक अशोक जंगले, लीला सुर्वे, आरोग्य विस्तार अधिकारी सुप्रिया कटारे यांच्यासह तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, बालविकास विभागाचे अिधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, कुपोषित बालकांचे पालक उपस्थित होते.सुरु वातीला दिशा केंद्राचे अशोक जंगले यांनी कुपोषण कमी कारण्यासाठी केवळ ग्राम बाल उपचार केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र तालुक्यातील कुपोषण कमी करण्यासाठी एकाच ठिकाणी म्हणजे ग्रामीण रु ग्णालयात दाखल करून महिनाभर उपचार करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. शेवटी चर्चेअंती कशेळे ग्रामीण रु ग्णालय आणि कर्जत येथील उपजिल्हा रु ग्णालय येथे सीटीसी म्हणजे बाल उपचार केंद्र पुढील आठ दिवसांत सुरु करण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी सांबरे आणि तहसीलदार कोष्टी यांनी जाहीर केले. त्यासाठी तालुक्यातील सॅममध्ये जी ४५ बालके आहेत, त्यांना दोन ठिकाणांपैकी शक्य आहे, तेथे दाखल करून उपचार केले जाणार आहेत. तालुक्यात १२० ही मॅम स्वरूपातील म्हणजे कुपोषित बालके आहेत. त्यांची वजने वाढवून कुपोषण कमी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांनी जागरूक राहण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी मोरे यांनी केले.>सीटीसी म्हणजे काय?अतिकुपोषित असलेल्या बालकांवर रु ग्णालयात दाखल करून महिनाभर उपचार करण्यात येतो. बाल उपचार केंद्र नाव असलेल्या या केंद्रात कुपोषित बालकांसह तेथे त्याच्या आईची राहण्याची व्यवस्था आहे. त्यांना निवास भत्ता म्हणून १०० रु पये आणि दिवसभर नाष्टा, जेवण यांची व्यवस्था असते. केंद्रात दाखल केलेल्या कुपोषित बालकांना बालरोगतज्ज्ञ यांच्याकडून तपासणी आणि उपचार करण्यात येतात. कर्जत तालुक्यात दोन वर्षांपूर्वी अशी बाल उपचार केंद्रे सुरू करण्यात आली होती.
कुपोषण निर्मूलनासाठी दोन बाल उपचार केंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2016 3:08 AM