भिवंडी : मित्रांसोबत खदानीच्या तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील पोगाव येथे बुधवारी सायंकाळी घडली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाकडून मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र अंधार पडल्याने शोधपथकाला शोधकार्य थांबवावे लागले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
मोहम्मद यासिम मोहम्मद ईस्लाम शेख ( वय-१५ वर्षे, रा. शांतीनगर) व मोहम्मद इम्रान वकिल अहमद खान ( वय १८ वर्षे, रा. गायत्री नगर ) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोघा मुलांची नावे असून ते सायंकाळी मित्रांसोबत मस्करपाडा पोगाव येथील येथे असलेल्या एका खदानीच्या तलावात पोहण्यासाठी गेले होते. मात्र यासीम व इम्रान या दोघांनी पाण्यात उडी घेतली असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले.
मित्र पाण्यात बुडत असल्याने या दोघांसोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा करत मित्र बुडल्याची माहिती आजूबाजूच्या नागरिकांना दिली असता येथील नागरिकांनी अग्निशमन दलासह पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनास्थळी तालुका पोलीस व अग्निशमन दल दाखल होत दोन्ही बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र सायंकाळी उशीर झाल्याने व अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी सात वाजेपासून शोधकार्य सुरु करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पोलिसांकडून देण्यात आली आहे.