ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 25 - नंदनवनमधील एका मदरशातून दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. शोएब (वय ११ वर्ष) आणि रेहान (वय ९ वर्षे) अशी बेपत्ता बालकांची नावे असून ते सख्खे भाऊ आहेत. ते पळून गेले की त्यांचे कुणी अपहरण केले, त्याचा शोध घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब आणि रेहान बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे रहिवासी आहेत. त्यांना वडील नाही. घरची स्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या आईला त्रास होत असल्याचे पाहून पारशिवनी (भोपाळ) येथील एका नातेवाईकाने त्यांना नागपूरच्या मदरशात शिकायला ठेवण्याचा निर्णय घेतला. मुलांना मात्र ते नको होते. आईला सोडून दुसरीकडे राहण्यास ते तयार नव्हते. तरीसुद्धा नातेवाईकाने २० डिसेंबरला त्यांना नंदनवनमधील शारदा नगर (खरबी) येथील मदरशात आणून सोडले. ते येथे राहायला तयार नसल्याचे पाहून त्यांचा दाखला (अॅडमिशन) करण्याचे टाळण्यात आले. ८ ते १० दिवस ठेवून बघायचे, त्यांचे मन लागले तर त्यांचा मदरशात दाखला करायचा अन्यथा त्यांना गावाला पोहचवून द्यायचे, असा विचार करून नातेवाईक निघून गेला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास शोएब आणि रेहान मदरशातून बेपत्ता झाले. ते गावातही पोहचले नाहीदोन तासानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर मदरशातील शिक्षक हाफीज अनवर कमाउद्दीन शेख (वय २२, रा. जामा मश्जिद, बाराशिवनी) यांनी नातेवाईकाला कळविले. दिवसभर शोधाशोध केल्यानंतर हाफिज यांनी शनिवारी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक एस. राऊत यांनी अपहरणाचा गुन्हा नोंदविला. प्राथमिक चौकशीत हे दोघे त्यांच्या गावालाही पोहचले नसल्याचे उघड झाले. या दोघांचा शोध घेतला जात आहे.