काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 12:06 PM2024-08-15T12:06:49+5:302024-08-15T12:13:34+5:30

या दोघा आमदारांनी मध्यरात्री घेतलेल्या भेटीमुळे तशा चर्चा सुरू झाल्या आहेत

Two Congress MLAs Hiraman Khoskar Jitesh Antapurkar likely to join Eknath Shinde Shiv Sena | काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत

काँग्रेसचे दोन आमदार शिंदेसेनेच्या वाटेवर? उमेदवारी मिळणार नसल्याने चाचपणी; चर्चांना ऊत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याची विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना काँग्रेसच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे इगतपुरी मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर आणि नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघातील आमदार जितेश अंतापूरकर यांनी मध्यरात्री ही भेट घेतल्याने ते शिंदे सेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले होते. त्यात या दोघा आमदारांवर संशयाची सुई होती. ज्या आमदारांनी विरोधात मतदान केले त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर या दोघा आमदारांनी मध्यरात्री घेतलेल्या भेटीमुळे तशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

विधान परिषद निवडणुकीपासून संशयकल्लोळ

राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हा खोसकर अजित पवार गटाबरोबर जाणार असल्याची चर्चा होती. महायुतीत इगतपुरीची जागा शिंदे सेनेला जाण्याची शक्यता असल्यान खोसकर यांनी शिंदे सेनेकडून तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

अंतापूरकर यांचा देगलूर मतदारसंघ जागावाटपात शिवसेनेकडे होता. राज्यसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाला अंतापूरकर गैरहजर होते. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच त्यांच्यावर काँग्रेसजणांचा अविश्वास होता. आता अंतापूरकर अचानक मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले. त्यामुळे ते  शिंदेसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्र्यांसोबत मतदारसंघातील निधीबाबत चर्चा झाली आहे. त्यासाठीच ती भेट होती;  मी कुणालाही भेटलो तर माझ्याविषयी वावड्या उठविल्या जात आहेत. मी काँग्रेस पक्षातच असून, यापुढेही पक्षातच राहणार आहे, शिवाय उमेदवारीदेखील मलाच मिळणार आहे.  
- हिरामण खोसकर, आमदार

देगलूर मतदारसंघात हजारो शेतकऱ्यांना २०२३ मधील नुकसानभरपाईचे पैसे मिळाले नाहीत. ते देण्यात यावेत, तसेच शासनाने जाहीर केलेले ५ हजार रुपयांचे अनुदान तुटपुंजे असून, कापूस आणि सोयाबीनचे हेक्टरी अनुदान वाढवून द्यावेत, असे प्रश्न मी मुख्यमंत्र्यांकडे मांडले.  
- जितेश अंतापूरकर, आमदार

Web Title: Two Congress MLAs Hiraman Khoskar Jitesh Antapurkar likely to join Eknath Shinde Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.