ठाणे : महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येनंतर, ‘आरोपी’च्या पिंज-यात असलेले मुख्यालयाचे सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस. बी. निपुंगे यांना शोधण्यासाठी, कळवा पोलिसांची दोन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. या आत्महत्येप्रकरणी आपल्याच वरिष्ठ पोलीस अधिकाºयाला शोधण्याची नामुश्की पोलिसांवर ओढवली.ठाण्यात घर नसल्यामुळे निपुंगे हे टेंभीनाका येथील पोलिसांच्या विश्रांतीगृहात वास्तव्याला होते. त्यांचे कुटुंब पुण्याला होते, तर नाशिकलाही त्यांचे एक घर आहे. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी ठाण्यातील दोन वेगवेगळी पथके पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे फोनही नॉट रिचेबल आहेत. ६ सप्टेंबरपासून शुक्रवारी तिसºया दिवशीही ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांनी सांगितले.कनिष्ठ महिला कर्मचारी सुभद्राला एसीपी निपुंगे यांनी मानसिक त्रास दिल्याची तक्रार, तिने तिचा भावी पती अमोल फापाळे यांच्याकडे केली होती. त्यामुळेच आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याशी सविस्तर बोलू, असेही अमोलने तिला सुचवले होते. तसा फोनही निपुंगे यांना केला होता. हीच माहिती अमोलने सुभद्राचा नवी मुंबई पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल भाऊ सुजित पवारला दिली. अमोल आणि सुजित जेव्हा पुन्हा सुभद्राच्या घरी आले, तेव्हा तिथे एसीपी निपुंगेही आले, पण तिने आत्महत्या केल्याचे समजताच, त्यांनी तिथून पळ काढला. अमोल आणि निपुंगेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात अमोलची दोन दिवसांपासून कळवा पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. निपुंगे यांनी सुभद्राचा मानसिक छळ केल्याचा त्याने पुनरुच्चार केला. दरम्यान, निवृत्तीला पाच वर्षे शिल्लक असलेल्या निपुंगेवरच्या आरोपाची उलटसुलट चर्चा आहे.
महिला कॉन्स्टेबल आत्महत्या: एसीपींना शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथके, अटक टाळण्यासाठी निपुंगेंचा आटापिटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 4:24 AM