अहमदनगर, दि. 15 - नगरपासून दहा किलोमीटर अंतरावर नगर- सोलापूर रस्त्यावरील पारगाव फाटा येथे शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन कंटेनर समोरासमोर धडकले. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. अपघात झाल्यानंतर अहमदनगरमध्ये पाऊस सुरू झाला त्यामुळे योग्यवेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले नसल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे पारगावपासून नगरपर्यंत दहा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी आठपर्यंत ही वाहने तशीच रस्त्यावर उभी होती.
हा रस्ता एमआयआरसी या लष्कर हद्दीतून जातो. पोलीस नसल्यामुळे अखेर लष्कराला वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले. लष्कराने काही वेळातच वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास वाहने जाण्यास सुरुवात झाली. नगर-सोलापूर रोड आधीच मोठ्या प्रमाणात खराब झाला असून पावसामुळे रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. जड वाहतुकीमुळे हा रस्ता व इतर वाहनांसाठी जणू बंदच होतो. इतर लहान वाहनधारक तसेच दुचाकीस्वार जीव मुठीत घेऊन प्रवास करत असतात. दिवसाचे चोवीस तास सुरू असलेल्या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे वाकोडी फाटा, दरेवाडी तसेच या परिसरातील लोकांचा प्रवास जीवघेणा झाला आहे.