वालचंदनगर : जंक्शन-कळस (ता. इंदापूर) रस्त्यावर भरणेवाडी हद्दीत बाबीरदेवाला जात असताना टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार, तर आठ गंभीर जखमी झाले. ही घटना सायंकाळी ५ वाजता भरणेवाडी हद्दीतील जंक्शन-कळस रस्त्यावर घडली. अपघातात भीमराव सोमा सूळ (वय ३७), तानाजी अनंदराव दगडे (रा. पिंपवडे, भावेनगर बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा) हे दोघे जागीच ठार झाले. टेम्पोतील विनायक रामभाऊ कोकरे (वय ५०), बापूराव कोकरे (वय ४५), बापूराव पिसे (वय ५०), संपत येळे (वय ५५), हेमंत पिसे (वय ४५), सोमा श्यामराव कोकरे (वय ३८), पोपट लाला कोकरे (वय ३५, सर्व रा. पिंपवडे भावेनगर, ता. कोरेगाव, जि. सातारा) व नंदकुमार काळू येळे हे जखमी झाले आहेत. विनायक रामभाऊ कोकरे यांच्या घरी बाबीरदेवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होती. त्यामुळे एक टन वजनाची पाषाणाची मूर्तीची पूजा करून जाण्यासाठी इंदापूर तालुक्यातील बाबीर मंदिरात येण्यासाठी गावातील आठ-दहा जण निघाले होते. भरणेवाडी हद्दीतील जंक्शन-कळस रस्त्यावर पावसाची झिमझिम सुरू होती. त्यामुळे टेम्पो रस्त्यावरून घसरल्याने पलटी होऊन हा अपघात झाला. टेम्पो (एमएच ११/एजी ७५३८)चे चालक नंदकुमार काळू येळे (वय ३८, रा. भावीनगर) यांनी ही माहिती दिली. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे व पोलीस निरीक्षक अविनाश राठोड यानी घटनास्थळी तातडीने भेट दिली. जखमींना उपचारांसाठी लासुर्णे येथील दवाखान्यात रवाना करण्यात आले आहे. (वार्ताहर)
अपघातात साताऱ्याचे दोन भाविक ठार
By admin | Published: August 24, 2016 1:18 AM