फलटण, दि. 8 - आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला सहकाऱ्यासह अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोन्हीही डॉक्टर बारामती अन् दौंड तालुक्यातील आहेत. गलांडेवाडी येथील आरोपी डॉक्टर प्रवीण कदम याची पत्नी शुभांगी यांना काही दिवसांपूर्वी तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला. त्यानंतर गर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम याने मागवून घेतली. तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिर्यादी अनिल कदम यांना संबंधित बारामतीच्या डॉक्टराकडून वेळोवेळी धमक्या येऊ लागल्या. व्हॉट्सअॅपवरून वेगवेगळे विचित्र मेसेजही फिरू लागले. या गोष्टीला कंटाळून अनिल डॉक्टरांनी प्रवीणचा मोबाइल नंबर ब्लॉक केला.
यानंतर अनिल यांच्या विरोधात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली. सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कमिटीने या प्रकरणाची चौकशी केली. डॉक्टर अनिल कदम यांनी केलेले उपचार व्यवस्थित असल्याचा अहवालही या कमिटीने दिला.
मात्र त्यानंतरही प्रवीण कदम यांचा सहकारी मित्र डॉक्टर नितीन टेळे याने फोन करून पैशांची मागणी केली. सातत्याने दहा लाख रुपयांची मागणी होऊ लागल्यामुळे घाबरलेल्या कदम डॉक्टरांनी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला. त्यानंतर सापळा रचण्यात आला. फोनवर तडजोड करून दहा लाखांऐवजी नऊ लाख रुपये देण्याचे ठरले.
गुरुवारी सायंकाळी तरडगाव येथील एका पेट्रोल पंपाजवळ असलेल्या हॉटेलमध्ये पैसे देण्याचे ठरले. दोन हजार रुपयांच्या खऱ्या खुऱ्या नोटेखाली कोरे कागद लावून बंडल तयार करण्यात आले. त्या ठिकाणी आलेले डॉक्टर प्रवीण अन् डॉक्टर नितीन यांनी खंडणीच्या स्वरूपात असलेली ही रक्कम स्वीकारताच आजूबाजूला उभारलेल्या पोलिसांनी या दोघांना रंगेहाथ पकडले.