लातूर : रुग्ण व नातेवाइकांना मारहाण केल्याप्रकरणी शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील दोन निवासी डॉक्टरांसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मारहाणीची घटना शनिवारी घडली असून रात्री उशिरा याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शहरातील कृपासदन रोड परिसरातील बाबुराव नामदेव कुंभार (६०) यांना शुक्रवारी रात्री शासकीय सर्वोपचार रुगणालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांच्यासह नातेवाइकांनाही रुग्णालयातून हाकलून देण्यात आले. आपल्या सासऱ्यांना अद्याप चक्कर येत असून, त्यांच्यावर उपचार करावा, अशी विनंती कुंभार यांचे जावाई बाळासाहेब रामरुळे यांनी निवासी डॉक्टरांकडे केली. मात्र डॉक्टरांनी सर्वांनाच धक्के देत बाहेर काढले. या प्रकाराचा जाब विचारणाऱ्या नातेवाईकांना रुग्णालयाचे गेट बंद करुन जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत बाबूराव नामदेव कुंभार (६०), पत्नी रेखाबाई (५०), मुलगी स्वाती (२४) व जावाई बाळासाहेब रामरुळे (२७) तसेच सून सुनंदा संतोष कुंभार (२७) हे जखमी झाले. या प्रकरणी डॉ. गणेश असावा, डॉ. सुनील सुभाष बोबडे, भीमा हरिबा गायकवाड, ज्ञानेश्वर गणेश सोनवणे या चौघांना रविवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरा याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)
दोन डॉक्टरांसह चौघे ताब्यात
By admin | Published: February 08, 2016 4:25 AM