मुंबई : शिक्षक भरतीसाठी तब्बल ५ वर्षांनी होणारी राज्यस्तरावरील अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) आणि देशपातळीवर होणारी केंद्रीय शिक्षक संघटन ही प्राथमिक शिक्षकपदासाठी होणारी परीक्षा एकाच आठवड्यात आली आहे. यामुळे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुण उमेदवारांपुढे कोणत्या परीक्षेला प्राधान्य द्यावे, असा प्रश्न उभा आहे.
पवित्र पोर्टल अंतर्गत शिक्षक भरतीसाठी राज्य परीक्षा परिषदेकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ऑनलाइन परीक्षा २२ फेब्रुवारीपासून ते ३ मार्चपर्यंत आयोजित केली जाणार आहे. दरम्यान, देशपातळीवरील केंद्रीय विद्यालयासाठी होत असलेली परीक्षा २१ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीमध्ये होणार आहे. अभियोग्यतेसाठी राज्यातील हजारो शिक्षक तयारी करीत असताना एकाच वेळी येणाऱ्या दोन परीक्षांमुळे मात्र, त्यांचा हिरमोड झाला आहे. याशिवाय इतर अनेकी परीक्षा याच कालावधीत होत असल्याने या उमेदवारांना इतर परीक्षांना मुकावे लागणार असल्याची भीती सतावत आहे.
राज्यभरातून हजारो उमेदवार अभियोग्यता चाचणी परीक्षेसाठी केवळ ८ दिवसांचा कालावधी कमी आहेच शिवाय तयारीसाठी वेळही अपुरा आहे. एकाच वेळी आलेल्या अनेक परीक्षांमुळे होतकरू उमेदवारांची संधी हुकू नये यासाठी वेळापत्रकात बदल करणे योग्य ठरेल.- संतोष मगर, अध्यक्ष, डी.टी.एड., बी.एड. स्टुडण्ट असोसिएशन.
तयारीसाठी अपुरा वेळ राज्य परीक्षा परिषदेकडून विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध भौतिक सुविधांनुसार वेळापत्रक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक डी.एड., बी.एड. पात्रताधारकही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करू लागले आहेत. याशिवाय ऑनलाइन परीक्षांच्या तयारीसाठी ही अल्पवेळ मिळत असल्याची नाराजी ते सोशल मीडियावर व्यक्त करीत आहेत.