मुंबई : महाड जिल्ह्यातील सावित्री नदीला आलेल्या पुरात दोन बसेस आणि काही खासगी वाहने बुडाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. त्या बसमध्ये मुंबईच्या गिरगाव आणि सांताकू्रझ परिसरातील दोन कुटुंबे होती. ती बेपत्ता झाल्याचे त्यांच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. जयगड - मुंबई ही बस सावित्री नदीत बुडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच बसमध्ये दापाली पाठकर (२८), त्यांचे पती भूषण पाठकर (२९) तसेच स्नेहल बालेकर (३०), त्यांचे पती सुनील बालेकर (३५) आणि त्यांचा ११ वर्षांचा मुलगा अनिल हे सर्व प्रवास करीत होते. दीपाली आणि स्नेहा या दोघी सख्या बहिणी असून, १० दिवसांपूर्वी त्यांचे वडील वारले. वडिलांच्या कार्यासाठी त्या दोघी कुटुंबासह रत्नागिरीतील त्यांच्या गावी गेल्या होत्या, अशी माहिती त्यांचा चुलत भाऊ समीर बालेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.बालेकर कुटुंबीय सांताक्रूझ तर पाठकर हे गिरगावात चर्नी रोड (पू.) परिसरात राहत होते. वडिलांचे कार्य उरकल्यानंतर या दोन्ही बहिणी कुटुंबासह मुंबईला परतत होत्या. त्यांनी रत्नागिरी येथील खंडाळा या बस स्थानकावरून जयगड - मुंबई ही बस पकडली. रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास त्यांनी ही बस पकडल्याचे त्यांचे मोठे भाऊ दीपक बालेकर यांनी सांगितले. त्यानंतर दोन्ही बहिणींशी नातेवाइकांचा काहीच संपर्क झाला नाही. (प्रतिनिधी)
सांताक्रूझ, गिरगावातील दोन कुटुंबे बेपत्ता
By admin | Published: August 04, 2016 4:50 AM