अकोला: सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून अकोला व वाशिम जिल्ह्यातील दोन शेतकर्यांनी आत्महत्या केली. पहिल्या घटनेत आकोट शहरातील केमलापूर येथील शेतकरी पुंडलीक सीताराम रेखाते (वय ६५)यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना ४ डिसेंबर रोजी रात्री उघडकीस आली. पुंडलीक रेखाते यांच्याकडे ४ एकर शेती असून,सततची नापिकी व लागवडीकरिता लावलेला खर्चही निघत नसल्याने ते खचले होते. त्यामुळे त्यांनी शेतात विष घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व चार विवाहित मुली असा आप्त परिवार आहे. दुसर्या घटनेत वाशिम तालुक्यातील सावंगा जहॉगिर येथील एका ३७ वर्षीय कर्जबाजारी शेतकर्याने शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सावंगा जहॉगिर येथील शांतीराम गोदमले असे आत्महत्या केलेल्या शेतकर्याचे नाव आहे. सातत्याने होत असलेली नापिकी आणि बँकेचे डोक्यावरील कर्ज कसे फेडावे या विवंचनेत ते होते. या विंवचनेतच त्यांनी शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आत्महत्या केली. २ महसूल विभागाचे कर्मचारी व पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा आहे.
पश्चिम व-हाडात दोन शेतकरी आत्महत्या
By admin | Published: December 06, 2015 2:09 AM