परभणी/लातूर : परभणी व लातूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. दुष्काळाशी तोंड देत असतानाच गारपीट झाल्याने उमराव प्रकाश घुगे (३६, परभणी) या शेतकऱ्याने विजेच्या तारेला स्पर्श करून आत्महत्या केली़ चार एकर शेती असलेले उमराव हे आर्थिक अडचणीत होते़ नुकतीच गारपीट झाल्याने गव्हाचे मोठे नुकसान झाले़ वडील सतत आजारी राहत असल्याने, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालेल या विवंचनेत ते होते़ ६ मार्चला त्यांनी विजेच्या तारेला स्पर्श केला़ त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते़ चाकूर (जि. लातूर) तालुक्यातील तिवटघाळ येथील बळीराम गुरदडे (२२) या तरुण शेतकऱ्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून मंगळवारी सकाळी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची १ एकर ८ गुंठे जमीन आहे़ बळीराम शिक्षण घेत शेतीही करत होता़ गेल्या वर्षी दोन बहिणींचा विवाह झाला. यंदा शेतात काहीच पिकले नसल्याने व कर्जामुळे तो सतत चिंतेत राहायचा. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
By admin | Published: March 09, 2016 6:08 AM