औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. लातूर आणि हिंगोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.लातूर जिल्ह्यातील येल्लोरी (ता. औसा) येथील जनार्दन पंढरी शेवाळे (६५) यांना येल्लोरी शिवारात १२ एकर शेती आहे. शेवाळे यांनी आपली सर्व शेतजमीन मुलांच्या नावावर केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने शेतीतून काही उत्पन्न निघाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, अशी चिंता त्यांना होती. त्यातच उपवर मुलीचा विवाह कसा करायचा, या विवंचनेतून त्यांनी शेतातील बाभळीच्या झाडास गळफास घेऊन बुधवारी पहाटे जीवनयात्रा संपविली. दुसरी घटना हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील अकोली येथे घडली. येथील रामराव बापूराव कदम (४०) सततच्या नापिकीला कंटाळले होते. त्यातच बँकेकडून घेतलेले कर्ज कसे फेडावे, याची चिंता त्यांना भेडसावत होती. याच चिंतेमध्ये कदम यांनी मंगळवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
मराठवाड्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Published: April 28, 2016 5:59 AM