लोकमत न्यूज नेटवर्कनारायणगाव : येडगाव धरणालगत असलेल्या पाण्यातून मोटार बाहेर काढणाऱ्या दोन मासेमारी करणाऱ्या युवकांना विद्युत प्रवाहाचा शॉक बसून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.११) सकाळी दहाच्या सुमारास घडली, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.या दुर्दैवी घटनेत श्रीनू गुलाबराव कोढा (वय २०) आणि शिवाजी बुचेराम पेरुमल्ला (वय २५) दोघेही सध्या रा. येडगाव, ता. जुन्नर, मूळ रा. कव्यूर राजमुंदरी, आंध्र प्रदेश हे मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची खबर यशवंत शिवराम खरात (रा. येडगाव) यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली.श्रीनू कोढा व शिवाजी पेरुमल्ला हे दोघेही येडगाव धरणात मासेमारी करण्याचा व्यवसाय करतात. मंगळवारी सकाळी दत्तात्रय भिसे व वसंत भिसे हे येडगाव धरणालगत असलेल्या पाण्यातून मोटार बाहेर काढण्यासाठी श्रीनू व शिवाजी या दोघांना घेऊन गेले होते. ते दोघे पाण्यात उतरताच त्यांना पाण्यातच विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला.
शॉक बसून दोन मासेमारांचा मृत्यू
By admin | Published: July 12, 2017 1:27 AM