कल्याण: राज्यातील अनेक महानगरपालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. अनेकविध पक्षांकडून मोर्चेबांधणीलाही सुरुवात झाली आहे. गुढीपाडव्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र, यातच मनसेला निवडणुकांपूर्वी मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश करत हाती शिवबंधन बांधणार असल्याची माहिती मिळाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे दोन माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या राजकीय डावपेचामुळे कल्याण-डोंबिवलीत मनसेला मोठे खिंडार पडल्याचे म्हटले जात आहे.
विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचीही सोडचिठ्ठी
घारीवली, काटई, उसरघर येथील मनसेच्या माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील, मनसे तालुका प्रमुख आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य गजानन पाटील तसेच माजी नगरसेवक आणि मनसेचे जिल्हा सचिव प्रकाश माने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यांच्यासह मनसेचे विभाग अध्यक्ष सुभाष तुकाराम पाटील, उपविभाग सचिव पांडे अण्णा, शाखा अध्यक्ष निशांत पाटील, भास्कर गांगुर्डे आणि विठ्ठल शिंदे हेदेखील हाती शिवबंधन बांधणार आहेत. याशिवाय मनसे विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष प्रवीण परदेशी, शाखाध्यक्ष संदीप मोरे यांनीही मनसेला रामराम केला असून, शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
दरम्यान, नुकतेच सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर पुन्हा एकदा ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरू झाली आहे. सर्व बाजूचे नेते या निर्णयावर आपल्या पक्षाची बाजू सांभाळण्याच्या प्रयत्नात आहेत.