जितेंद्र कालेकर/ ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 4 - मुंबई आणि ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टक्कुसिंग टाक (शिकलकर, रा. नारंगीफाटा, विरार, पालघर) याच्यासह शिकलकर टोळीतील पाच तसेच चार सराफ आणि अन्य टोळीतील चौघे अशा १३ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून लुटीतील २६ लाखांच्या सोने चांदीसह ५५ लाख ८४ हजारांचा ऐवजही हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्हयांची कबूली दिली आहे.विमलसिंग उर्फ राज टाक (२९, शिकलकर), विकी सिंग कलाणी उर्फ शिकलकर (२८, रामटेकडी, हडपसर, पुणे), घुंगरुसिंग तिलपिटीया उर्फ शिकलकर (४४, रा. वडोदरा, गुजरात) आणि किस्मतसिंग शिकलकर (३१, रा. धुळे ) या शिकलकर टोळीसह निरव उर्फ निशीत सोनी (३४, रा. धुळे), संदीप डहाळे (३५), विक्रम गलांडे (२८), पुरुषत्तोम दंडगव्हाळ उर्फ बापूशेठ (५५, रा. चौघेही नाशिक ) या चार सराफांनाही अटक करण्यात आली आहे. चोरीनंतर हे टोळके नाशिकच्या या सराफांकडे दागिन्यांची विक्री करीत होते. चोरीचा माल अल्प किमतीत घेऊन या टोळीला मदत केल्याप्रकरणी सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून कापूरबावडी, मुंब्रा या भागातील चोऱ्या उघडकीस आल्या असून, ७५५ ग्रॅम सोने आणि १४ किलो ७०७ ग्रॅम चांदी असा २६ लाख दोन हजार ७६७ रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तर श्रीकृष्णा पांडे (३१, वसई), ललीत हरीजन (२२, वसई) आणि अजयकुमार उर्फ दुर्गाप्रसाद हरीजन (२२, वसईरोड, भिवंडी) या तिघांकडून गोदाम चोरीतील सात गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून २० लाख ९४ हजार ३८९ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्यांनी भिवंडीतील प्लास्टीक दाणा गोदाम फोडले होते. त्यांना नवी मुंबई भागातून अटक करण्यात आली. याशिवाय, जमील सलमानी अहमद (२३, रा. नालासोपाला) यांच्याकडून भांडूप भागातील चोरी उघडकीस आली. एका नामांकित कंपनीच्या ट्रकचे आठ लाख ८७ हजार ३१५ रुपयांचा १०० टायर त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. ठाणे शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या भागातील चोऱ्या उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलिसांना दिले होते.सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुणे, गुजरात आणि पालघर भागातून या सर्वांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन अनेक सराफाच्या व्यापाऱ्यांना केले होते. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी असे सीसीटीव्ही लावले. दिवा, कापूरबावडी येथील एका सीसीटीव्हीत हे टोळके आढळल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आल्याचे मणेरे यांनी सांगितले. मोबाईल न वापरता पोलिसांना चकवाशिकलकर टोळीतील टक्कुसिंग आणि त्याचे साथीदार पोलिसांना चकवा देण्यासाठी मोबाईलचा वापर करीत नव्हते. तसेच वारंवार राहण्याचे ठिकाणही बदलत होते, अखेर त्यांचा ठावठिकाणा लागल्यानंतर या सर्वांना वेगवेगळया ठिकाणांवरुन पकडण्यात आले.वाटणी झाल्यावर वेगळेएखाद्या ठिकाणी चोरी केल्यानंतर समान वाटणी करायची. त्यानंतर ते एकत्र न राहता वेगवेगळया ठिकाणी राहायला जात होते.
घरफोड्या करणाऱ्या दोन टोळया जेरबंद: ५५ लाखांचा ऐवज हस्तगत
By admin | Published: January 04, 2017 8:33 PM