नाशिक : येथील सारडा सर्कल परिसरात असलेल्या गॅरेजेसपैकी दोन दुकानांना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या या दुकानांमध्ये एका दुकानात गादी-कुशन्सचा माल भरलेला होता तर दुसºया दुकानात आठ ते दहा नादुरस्त दुचाकींचा लागलेल्या आगीत कोळसा झाला.
फैय्याज शेख यांच्या मालकीचे गॅरेज ‘बाईक पॉइंट’ होते. पत्र्याच्या दुकानाजवळ महावितरणच्या विजवाहिन्या गेल्या आहेत. या वीजवाहिन्यांमध्ये बिघाड होऊन घर्षण होऊन निघालेल्या ज्वाला पत्र्यावर पडल्या. त्यामुळे अझहर कमरूद्दीन शेख यांच्या मालकीचे गादी-कुशन्सचे दुकानाने त्वरीत पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच जवळील अग्निशामक मुख्यालयातून पाण्याचे तीन बंब घटनास्थळी अवघ्या काही मिनिटांतच दाखल झाले. जवानांनी त्वरित पाण्याचा मारा करून आग विझविण्यास सुरूवात केली. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविताना जवानांना अर्ध्या तासापेक्षा अधिक कालावधीपर्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर आग आटोक्यात आली. या आगीचे लोण वाढल्याने शेजारी असलेले शेख यांच्या मालकीचे बाईक पॉइंट या गॅरेजमधील आठ ते दहा दुचाकी जळून खाक झाल्या.तसेच लगतच्या चंद्रकांत भाऊराव वाघ यांचे सलूनचे दुकानही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
साडे तीन ते चार लाख कु शन्सच्या दुकानाचे गॅरेजमालकाचे आठ ते दहा लाखांचे तर वाघ यांच्या सलूनच्या दुकानाचे पन्नास ते साठ हजारांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालकांनी व्यक्त केला आहे. महावितरण कडे गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने ‘स्पार्क’च्या बाबतीत तक्रार करूनदेखील संबंधितांनी र्दुलक्ष केले आणि शनिवारी (दि.१३) झालेल्या पावसामुळे बिघाड अधिक वाढला आणि सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ‘स्पार्क’ झाल्याने दुकानांना आग लागल्याचे दुकानमालक फैय्याज शेख, अझहर शेख, चंद्रकांत वाघ यांचे म्हणणे आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे याबाबत लेखी तक्रार करून नुकसानभरपाईची मागणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेला महावितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचा आरोप दुकानमालकांनी केला आहे.