नागपूर/हिंगणघाट : हिंगणघाट येथील दोन गुंडांनी बुधवारी नागपुरात पोलिसांवर गोळी झाडली. ही घटना दुपारी दक्षिण नागपुरातील मोठा ताजबाग येथे घेडली. पोलीस नोंदीनुसार देशीकट्ट्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी हे दोन्ही आरोपी फरार आहेत.अवी नवरखेडे व शुभम रमेश लोंढे अशी गोळीबार करणाऱ्या गुंडांची नावे आहेत. हिंगणघाट पोलीस या दोघांच्या मागावर होते. अवी याच्या भाचीचे बुधवारी नागपूर येथे लग्न होते. या ठिकाणी अवी येणार अशी माहिती हिंगणघाट पोलिसांना मिळाली. त्याआधारे हिंगणघाटचे ठाणेदार निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने सक्करदरा पोलिसांच्या मदतीने सापळा रचला.दुपारी २च्या सुमारास अवी त्या परिसरात दिसताच हिंगणघाटच्या चारही पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने देशीकट्ट्यातून पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली.सुदैवाने ती कुणालाही लागली नाही. हे दोघे पळून जात असताना पोलिसांनी झडप घालून त्यांना जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन देशी कट्टे व जिवंत काडतूस जप्त केले. (प्रतिनिधी)
दोन गुंडांचा पोलिसांवर गोळीबार
By admin | Published: April 28, 2016 1:09 AM