सिंधुदुर्ग - कोकणाच्या राजकीय नकाशावरील संवेदनशील केंद्र असलेल्या कणकवलीमध्ये आज पुन्हा एकदा राडा झाला. नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर समर्थक यांच्या गटात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी आणि मोडतोडीत झाले. कणकवली कॉलेज रोड येथे दुपारी साडे बाराच्या सुमारास हा प्रकार घडला.नगराध्यक्ष समीर नलावडे समर्थक आणि माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर समर्थक यांनी एकमेकांना प्रसाद दिला. दरम्यान या प्रकरणामुळे वातावरण तंग असून पोलिसांनी फौजफाटा तैनात केला आहे. यात पारकर यांच्या निवासस्थानासमोर असलेल्या दोन दुचाकींचे नुकसान झाले. तसेच काहींना प्रसाद देखील मिळाला. पोलिस बंदोबस्त आल्यानंतर हाणामारी थांबली. मात्र बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नगरपंचायत निवडणुकीत एका उमेदवाराचे काम केल्यावरून गेले काही दिवस अंतर्गत वादंग सुरू होता. आज नगराध्यक्षांना अपशब्द उच्चारल्यावरून वादंगाचे पर्यावसान हाणामारीत झाले. या घटनेची जोरदार चर्चा शहरात सुरू होती. मारहाणीमागे पारकर गटाचा हात : नगराध्यक्ष समीर नलावडे
माजी नगराध्यक्ष पारकर गटाच्या २० ते २५ जणांनी आमच्या २ कार्यकर्त्यांना कॉलेज आवारात लाथ्या-बुक्क्यांनी मारहाण केली असा आरोप नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज येथे केला.मारहाण नाटयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.