सांगली : जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या आरोग्यसेविका पदाच्या परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी गेल्या चार दिवसांपासून ताब्यात असलेल्या दोन आरोग्यसेविका महिलांना शहर पोलिसांनी अखेर गुरुवारी रात्री अटक केली. शकिरा शौकत उमराणी (रा. कवलापूर, ता. मिरज) व शाहीन अजमुद्दीन जमादार (करगणी, ता. आटपाडी) अशी त्यांची नावे आहेत. दरम्यान, आळते (ता. तासगाव) येथील आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवकासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले. पेपर फोडून तो परीक्षार्थींना देण्यासाठी लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे. यामध्ये अनेक बडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे चौकशीत पुढे येत आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेविका भरती परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी कंत्राटी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या व परीक्षेसाठी परीक्षार्थी म्हणून बसलेल्या शाहीन जमादार हिला कॉपी करून पेपर लिहीत असताना रंगेहात पकडण्यात आले होते. तिच्यासह तिला मदत करणारी नियमित आरोग्यसेविका शकिरा उमराणी, या दोघींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. जिल्हा परिषद प्रशासनाने शाहीन जमादार हिला बडतर्फ, तर उमराणीला निलंबित केले आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून या दोघी चौकशीसाठी ताब्यात होत्या. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयात त्यांची चौकशी सुरु होती. चौकशीत त्यांच्याकडून या प्रकरणात आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक व काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. गुरुवारी रात्री शाहीन जमादार व शकिरा उमराणी यांना अटक करण्यात आली. शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली. आळते (ता. तासगाव) येथील एका आरोग्य सेवकाचे नावही चौकशीतून पुढे आले आहे. हा आरोग्यसेवकही कवलापूरचा आहे. त्यालाही शुक्रवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. ते म्हणाले, आळतेसह तासगाव तालुक्यातील आणखी एक आरोग्यसेवक ताब्यात आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. येत्या चार-पाच दिवसांत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यात यश येईल. ज्या अधिकारी, आरोग्य सेवक व कर्मचाऱ्यांची नावे पुढे आली आहेत, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (प्रतिनिधी)सात ते आठ लाखांचा दरपेपर फोडण्याचे नियोजन परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. संशयितांनी प्रत्येक उमेदवाराकडून सात ते आठ लाख रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. कदाचित हा आकडा यापेक्षा जादाही असू शकतो. याची पोलीस चौकशी करीत आहेत. संशयित किती उमेवारांच्या संपर्कात होते, त्यांनी कितीजणांकडून पैसे गोळा केले होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण तपासातून या बाबीही उजेडात आणल्या जातील, असे गायकवाड यांनी सांगितले. जिल्हा परिषदेकडून असहकार्यपेपरफुटीचे हे प्रकरण राज्यभर गाजले. पोलिसांनीही गतीने तपास सुरु ठेवला आहे. पण जिल्हा परिषदेकडून पोलिसांना म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. पोलिसांनी तपासाच्यादृष्टीने काही कागदपत्रांची मागणी केली आहे. पण जिल्हा परिषदेकडून ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. केवळ दोन आरोग्यसेविकांवर कारवाई केल्याचा आटापिटा करून, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येते.
दोन आरोग्यसेविकांना अटक
By admin | Published: December 05, 2015 12:29 AM