मुंबई : पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करणाऱ्या दोन एजंटना उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र एटीएसच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी अटक केली. आफताब अली आणि अल्ताफ कुरेशी अशी या एजंटची नावे असून हे दोघेही भारतात हेरगिरी करण्याचे काम करत होते. कुरेशीजवळून ७० लाख रुपयांची रोख रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. दोन्ही आरोपींच्या अटकेने सबंध देशात मात्र एकच खळबळ उडाली आहे.उत्तरप्रदेश एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील नागपाडा परिसरात राहाणारा अल्ताफ कुरेशी हा हवाला रॅकेट चालवत असून तो आयएसआयसाठी काम करत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. अल्ताफने काही रक्कम आफताब अलीच्या फैजाबाद येथील खात्यामध्ये जमा केली. याची माहिती मिळताच उत्तरप्रदेश एटीएसच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एटीएससोबत संयुक्तरित्या कारवाई करण्यास सुरूवात केली. उत्तरप्रदेश एटीएसच्या अधिकाऱ्यांनी फैजाबाद परिसरात आफताबला बेड्या ठोकल्यानंतर काही तासांतच एटीएसच्या संयुक्त पथकाने नागपाड्यातील युसूफ मंजिल इमारतीमध्ये अल्ताफच्या फ्लॅटवर छापा टाकला. त्याला ७० लाख रुपयांच्या रोख रक्कमेसोबत अटक केल्याचे उ. प्रदेशच्या एटीएसमधील अधिकाऱ्याने सांगितले. आफताब हा पाकचा व्हिसा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र अनेकवेळा त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आल्याचेही तपासात समोर आल्याचे उत्तर प्रदेश एटीएसचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)सांकेतिक नावांचा वापरआफताबने पाकिस्तानात आयएसआयकडून हेरगिरी करण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे पुरावेही यावेळी हाती लागले आहेत. तो पाक उच्चायुक्तालयाच्या संपर्कात होता. यासाठी तो सांकेतिक नावाचा वापर करत होता, अशीही माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे.
‘आयएसआय’च्या दोन एजंटना अटक
By admin | Published: May 04, 2017 5:11 AM