ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. २४ - मुंबई गोवा महामार्गावर रविवारी पहाटे दोन भीषण अपघात झाले असून या अपघातांमध्ये दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे येणारी वाहतूक पेण - खोपोली मार्गे वळवण्यात आली आहे.
पेण - हमरापूर फाट्याजवळ दोन ट्रकमध्ये भीषण धडक झाली. या धडकेत सिलेंडर वाहून नेणा-या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने आग लागली. सिलेंडरचे तुकडे सुमारे १०० फुटांपर्यंत उडाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या अपघातात दोन जण जखमी झाले.
दुसरा अपघात रायगडजवळ झाला असून एक खासगी बस झाडावर जाऊन आदळली. बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहे. जखमींपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.