पुणे : पती-पत्नी पीएमपी बसने प्रवास करीत असतात... दोन चोरटे महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढतात... महिला प्रसंगावधान राखत त्याला पकडण्याचा प्रयत्न करते... पती चोरापाठोपाठ चालत्या बसमधून खाली उडी मारतो... चोरटा त्यांना दगड फेकून मारतो... जखमी झालेला पती पाठलाग सोडत नाही... एक चोरटा नदीमध्ये उडी मारून पोहत पोहत दुसऱ्या बाजूला जातो... तब्बल दोन किलोमीटर हा पती त्याचा पाठलाग करतो... दरम्यान, पोलिसांनाही कळवतो... शेवटी त्या चोराला जेरबंद करूनच हा पत्नीला भेटतो... सिनेमाच्या कथानकाला शोभणारी ही खरीखुरी घटना मंगळवारी पुण्यात घडली.प्रशांत अनिल पवार (वय २७, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार रवी गायकवाड पसार झाला आहे. याप्रकरणी पंढरीनाथ सस्ते (वय ४५, रा. यवत, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सस्ते आणि त्यांची पत्नी हडपसर ते मुंढवा असा पीएमपीने प्रवास करीत होत्या. त्यांना साईनाथनगर बसथांब्यावर उतरायचे असल्यामुळे दोघेही पुढच्या दरवाजाजवळ येऊन उभे राहिले होते. बसथांबा जवळ येताच पाठीमागून झपकन आलेल्या आरोपींनी सस्ते यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. हे लक्षात येताच त्यांनी विरोध केला. आरोपींनी बसमधून खाली उडी मारून पलायन केले. असा केला पाठलागसस्ते यांनीही बसमधून उडी मारून आरोपींचा पाठलाग सुरू केला. सस्ते यांच्या पाठीमध्ये लाथ मारून गायकवाड पसार झाला. मग त्यांनी पवारचा पाठलाग सुरू केला. आपला पाठलाग होत असल्याचे पाहून पवारने सस्ते यांना दगड फेकून मारला. तो त्यांच्या डोक्याला लागला. मुंढवा पुलावरून नदीपात्रामध्ये उडी मारून चोरटा पवार पसार होत असताना त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना कल्पना देत पाठलाग सुरूच ठेवला. पोलीस आणि सस्ते पाठलाग करीत करीत केशवनगरमध्ये पोचले. आरोपी पवार नदीपात्रामाधून बाहेर येत असताना ढवळे, सस्ते आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद केले. चोरीचे मंगळसूत्र त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले.
पत्नीच्या मंगळसूत्रासाठी दोन किलोमीटर चोरांचा पाठलाग
By admin | Published: September 01, 2016 1:44 AM