ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - अंतर्वस्त्रात सोने लपवून सोन्याची तस्करी करणा-या महिलेला सोमवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क अधिका-यांनी अटक केली. फरहाथ उनीसा असे आरोपी महिलेचे नाव असून, तिच्याकडे २.२ किलो सोने सापडले. या सोन्याची एकूण किंमत ६४ लाख रुपये आहे.
अंतर्वस्त्रात सोने लपवून ही महिला विमानतळा बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना कस्टम अधिक-यांनी तिला अटक केली. कस्टमने नंतर फरहाथाची जामिनावर सुटका केली. फरहाथ नियमित हवाई प्रवास करायची असे अधिका-यांनी सांगितले.
तिची तपासणी केल्यानंतर अधिका-यांना संशय आला. कस्टम अधिका-यांनी तिची सखोल चौकशी सुरु केल्यानंतर तिने सोन्याच्या तस्करीची कबुली दिली. फराथा जेट एअरवेजच्या विमानाने दुबईहून मुंबई विमानतळावर उतरली होती.
स्मगलर्स गोल्ड तस्करीसाठी महिलांचा वापर करतात असे अधिका-याने सांगितले. ते यासाठी विमानतळावरील कर्मचा-यांचाही वापर करतात. १५ लाख रुपयांच्या सोने तस्करी प्रकरणात कस्टमने अलीकडेच एअर इंडियाच्या वैमानिकाला अटक केली होती.