कळस : रुई (ता. इंदापूर) येथील बाबीरदेवाची यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी राज्यासह गुजरात, कर्नाटक राज्यांतूनही अनेक भाविकांनी हजेरी लावली होती. सुमारे दोन लाख भाविकांनी यात्राकाळात देवदर्शनासाठी हजेरी लावल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली.सोमवारी देवाच्या पालखीची गावातून वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. भगतांच्या काठ्या, तोफांच्या सलामीने पालखीने मंदिरातकडे प्रस्थान ठेवले. सकाळी देवाची महापूजा झाली व यात्रेस सुरुवात झाली. मंगळवार हा यात्रेचा मुख्य दिवस होता. यादिवशी यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती. याशिवाय जलसंधारणमंत्री राम शिंदे, तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, गोपीचंद पडळकर, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, दशरथ माने, माऊली चवरे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील आदी नेत्यांनीही देवदर्शनासाठी हजेरी लावली. महिलांनी यात्रा बाजारात खरेदीचा व पाळण्यात बसण्याचा आनंद लुटला. तसेच मंगला बनसोडे या तमाशाचा कार्यक्रम झाला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील, सरपंच आकाश कांबळे, बाळासाहेब भगत, यात्रा समितीचे अध्यक्ष तात्या मारकड यांनी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले. (वार्ताहर)>गेल्या वर्षीपासून नवसाची परतफेड करताना पायाला दोर बांधून उलटे शेंदण्याची प्रथा बंद करण्यात आली. त्याऐवजी पाळण्यात बाळाला बसवून झोका देण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. पारंपरिक गजेढोल स्पर्धाही भरविण्यात आली होती. आई सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत अन्नदान करण्यात आले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, सहायक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे आदींनी यात्राकाळात प्रशासनाच्या बाजूने नियोजनाची चोख भूमिका बजावली.
दोन लाख भाविक
By admin | Published: November 02, 2016 1:18 AM