३४ नोटा जप्त : ११ पर्यंत पोलीस कोठडी, बाजारात आढळले संशयास्पद हालचाली करताना आमगाव (गोंदिया) : नकली नोटा चलनात आणणाऱ्या राज्यस्तरीय टोळीतील आमगावच्या दोन व्यापाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून ५०० रुपयांच्या ३४ नोटा जप्त केल्या आहेत. न्यायालयाने या आरोपींना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नकली नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचे ते सदस्य असून यापूर्वी त्यांनी नकली नोटा चलनात आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.आमगाव येथील नैवेद्यम रेस्टॉरेंटचे मालक प्रल्हाद सुरेशप्रसाद दुबे (५०) व नवीन कृष्णकुमार असाटी (२६), दोघेही रा.आमगाव या दोघांनी मागील अनेक दिवसांपासून नकली नोटा चलनात आणण्याचा व्यवसाय सुरु केला होता. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. आमगाव पोलिसांनी शनिवारच्या सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सापळा रचून येथील बाजार चावडी येथे त्या दोघांना संशयास्पद हालचाली करताना पकडले. त्यांची अंगझडती घेतल्यावर दोघांजवळून ५०० रुपयांच्या ३४ नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या. त्यात प्रल्हाद दुबेजवळ सिरीज क्रमांक ५ डीडी ५९८७८८ च्या ११ नोटा व सिरीज क्रमांक ९ बीके ९७६६५९ च्या ९ नोटा समान सिरिजच्या आढळल्या तर नवीन असाटी याच्याकडे असलेल्या १४ नोटांपैकी ८ नोटा (५ डीडी ५९८७८८), ३ नोटा (९ बीके ९७६६५९) व ६ नोटा (४ एचजी ५८६३७४) अशा समान सिरीजच्या आहेत. १७ हजार रुपयांच्या ३४ नकली नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या. रात्रभर त्यांची चौकशी सुरू होती.सदर कारवाई पोलीस निरीक्षक डी.बी. मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन पवार, हवालदार निलू बैस, किराडे, खेमराज खोब्रागडे यांनी केली. आरोपी पोलिसांना पाहून पळण्याचा बेतात होते. परंतु पोलिसांनी सापळा रचल्यामुळे ते पळून जाण्यात अयशस्वी झाले. या आरोपींची रविवारी सकाळी गोंदियाच्या केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करून आमगावच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ११ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ४८९ ब, ४८९ क, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)
नकली नोटांसह दोन व्यापारी पकडले
By admin | Published: July 07, 2014 12:55 AM