मडगाव : गोव्यातील जैका प्रकल्पाचे कंत्राट मिळविण्यासाठी अमेरिकेतील कंपनीने दिलेल्या ६ कोटींच्या लाच प्रकरणात तत्कालीन काँग्रेस सरकारमधील एक नव्हेतर दोन मंत्र्यांचा सहभाग होता, असा गौप्यस्फोट संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथे केला. लाचखोरीच्या प्रकरणाचा सीबीआयमार्फत तपास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे कंत्राट २०१०मधील आहे. येथील भाजपा कार्यकर्ता संमेलनात रविवारी संरक्षणमंत्र्यांनी पाणीपुरवठा व मलनिस्सारण विषयक जैका प्रकल्पाच्या भ्रष्टाचारासंबंधी मुद्द्यालाही स्पर्श केला. कोणत्या बंगल्यात कंत्राटासंबंधी बोलणी चालू होती? तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी ही रक्कम फुटबॉलकडे वळविली की स्वित्झर्लंडमध्ये ठेवली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जैका प्रकल्पाच्या कंत्राटासाठी सरकारी तिजोरीची लूट होत होती. आम्ही सत्तेवर आल्यानंतर २0१३मध्ये त्यात लक्ष घालून कंत्राटाची रक्कम कमी केली, असा दावाही त्यांनी केला. गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, यासाठी पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांकडे लेखी पत्रव्यवहार करेन, असे सांगितले.आॅगस्ट २०१०मध्ये अशाच कामांसाठी गोव्याच्या तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना ६ कोटींची लाच दिल्याची कबुली जैका प्रकल्पाशी संबंधित लुईस बर्जर या अमेरिकेतील कंपनीने दिली.(प्रतिनिधी)
लाचखोरीत गोव्यातील दोन मंत्री
By admin | Published: July 20, 2015 1:15 AM