मुंबई : अशिक्षित व्यक्तीस फार्मासिस्ट्स बनवा अशा फार्मासिस्टविरोधी व जनारोग्यद्रोही मागणीच्या विरोधात राज्यभरातील फार्मासिस्टने गुरुवारी आझाद मैदानात आंदोलन केले. आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट्स अॅण्ड ड्रगिस्ट या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी अनुभवाच्या आधारे फार्मासिस्टची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे, त्यामुळे शासनाने शिंदे यांचा त्वरित राजीनामा घ्यावा या प्रमुख मागणीसाठी फार्मासिस्ट एकत्र आले. शिंदे यांची तक्रार करत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासंबंधी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषद यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ही परिषदही बरखास्त करण्याची मागणी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट्स असोसिएशनने केली आहे. तसेच फार्मसी कौन्सिल आॅफ इंडियाचे शिंदे यांचे सदस्यत्वही रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रलंबित मागण्यांविषयी महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट्स असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले असल्याची माहिती असोसिएशनचे प्रवक्ते शशांक म्हात्रे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. याशिवाय, केंद्र शासनाने मंजूर केलेला फार्मसी प्रॅक्टिस रेग्युलेशन २०१५ कायदा राज्यात लागू करावा. राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांवर फार्मासिस्टच्या नियुक्त्या तत्काळ कराव्यात आणि औषधी कंपन्यांमध्ये औषधे उत्पादनापासून ते औषधे विक्रीपर्यंत फार्मासिस्टची नियुक्ती करावी या मागण्याही लवकरात लवकर मान्य करण्यात याव्यात असे असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
...तर फार्मासिस्ट्स रस्त्यावर उतरतील
२००८ पासून आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट ही व्यापारी संघटना मेडिकल स्टोअर्समध्ये पाच वर्षे काम केलेल्या कोणत्याही व्यक्तीस फार्मासिस्ट म्हणून मान्यता देण्याची मागणी करीत आहे. ही मागणी पूर्ण होण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमही तयार होत आहे. त्यामुळे बेसावध राहिल्यास याचा परिणाम संपूर्ण जनारोग्यावर होईल. फार्मासिस्ट्स असोसिएशनच्या मागण्या दोन महिन्यांत पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल. यंत्रणेच्या विरोधात वेळ पडल्यास फार्मासिस्ट्स रस्त्यावर उतरतील. - कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट्स असोसिएशन