मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले हे आपल्या खासदारकीचे दोन महिन्यांचे वेतन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. २०, २१ आणि २२ सप्टेंबरदरम्यान ते दुष्काळी दौऱ्यावर जात असून, उस्मानाबाद येथील दुष्काळ परिषदेने या दौऱ्याची सांगता होणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. वांद्रे येथे आयोजित पत्रकार परिषदेत आठवले म्हणाले की, दुष्काळावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी दीर्घकालीन उपाययोजनांची आवश्यकता आहे. जास्त पाऊस पडणाऱ्या मुंबई व कोकणातील पाणी दुष्काळी प्रदेशांमध्ये वाहून नेण्याची आवश्यकता आहे. तसा आराखडा बनविण्याची मागणी १५ वर्षांपासून करत आहोत; मात्र केंद्र व राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली. दुष्काळी परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी अभ्यासगटाची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत असताना शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही. मात्र आता विरोधी बाकांवर बसायची वेळ आल्यावर ते मागणी करीत आहेत. त्यांनी सिंचनाचे क्षेत्र वाढवले असते तर दुष्काळाशी चांगला सामना करता आला असता, असा टोलाही आठवले यांनी लगावला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देशातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घेतलेल्या भेटीकडे राजकीय नजरेने पाहण्याची गरज नाही, असेही आठवले यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नावर सांगितले. सढळ हस्ते मदत करावी तीन दिवसांच्या दौऱ्यात मी सांगली, सातारा, सोलापूर, बीड, लातूर व उस्मानाबाद या सहा जिल्ह्यांना भेटी देणार आहे. उद्योगपती, बॉलीवूड क्षेत्रातील व्यक्ती व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांनी व सर्वसामान्य नागरिकांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी. - आठवले
दुष्काळग्रस्तांसाठी दोन महिन्यांचा पगार
By admin | Published: September 16, 2015 12:26 AM