अकोला : किडनी तस्करी प्रकरणातील आरोपी सांगली जिल्ह्यातील शिवाजी कोळी आणि बुलडाणा जिल्ह्यातील विनोद पवार हे रविवारी पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणी देवेंद्र सिरसाट व आनंद जाधव या दोघांना अटक केल्यानंतर, त्यांच्याकडून पोलिसांना काही नावे मिळाली. त्याआधारे पोलिसांनी जोरदार शोध मोहीम सुरू केली आहे.स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी तपास करून नागपूर, औरंगाबाद आणि सांगली येथे पोलीस पथके पाठविली. नागपूर आणि औरंगाबाद येथील चार डॉक्टर आणि औरंगाबाद येथील एका इस्पितळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास अकोल्यात आणण्यात आले. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.आता शिवाजी कोळीलाही ताब्यात घेतले असले तरी, पोलिसांनी त्याच्याबाबतीत रविवारी रात्रीपर्यंत गुप्तता बाळगली. नंतर उशिरा त्याला अटक केल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. कोळी हा या रॅकेटमधील प्रमुख आरोपी असून त्याने किती जणांच्या किडनी काढल्या आहेत, त्याचे हे जाळे कुठपर्यंत पसरलेले आहे आदी महत्त्वपूर्ण माहिती समोर येऊ शकते.शांताबाई खरात हिच्या तक्रारीनुसार, ५ लाख रुपयांमध्ये किडनी विकण्यासाठी आनंद जाधव व देवेंद्र सिरसाट यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील मांडवा येथील विनोद पवार याच्याशी तिची ओळख करून दिली. त्यानंतर पवार हा शांताबाईला औरंगाबाद येथे घेऊन गेला होता. तेथे तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर किडनी काढण्यात आली होती. (प्रतिनिधी)औरंगाबाद येथील एका इस्पितळामध्ये चार जणांची किडनी काढून अन्य रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यापूर्वी इस्पितळाने प्रस्ताव तयार केला आणि हा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आला. कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर जिल्हास्तरीय समितीने या प्रस्तावास मंजुरी दिली नाही. त्यानंतर इस्पितळाने हा प्रस्ताव राज्यस्तरीय वैद्यकीय समितीकडे पाठविला. या समितीने किडनी काढण्यास व प्रत्यारोपणास मंजुरी दिली. त्यामुळे चार जणांच्या किडनी काढून इतर रुग्णांच्या शरीरात त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले; परंतु जिल्हास्तरीय समितीने इस्पितळाच्या प्रस्तावास मंजुरी का नाकारली होती, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे.कोळीकडे पासपोर्ट सापडलासांगली /आष्टा : बहाद्दूरवाडी (ता. वाळवा) येथील शिवाजी कोळी याचा डॉक्टर मुलगा विजय यास दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेतले होते. पण कोळी हजर झाल्याने त्यास सोडून देण्यात आले आहे. कोळी याच्याकडे पासपोर्ट आढळून आला आहे. तसेच तो एकदा श्रीलंका वारी करुन आल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. कोळी हा इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर आहेत. संस्थेच्या कामानिमित्त श्रीलंकेला गेलो होतो, अशी माहिती त्याने चौकशीदरम्यान दिली असल्याचे समजते.
आणखी दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात!
By admin | Published: December 07, 2015 1:54 AM