- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 2 - गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शस्त्र तस्करीप्रकरणी पकडलेल्या जेनीबाई ताना बारेला हिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी दोन अग्निशस्त्र आणि 7 जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्याच आठवड्यात जेनीबाईला लष्कर भागात पकडून तीन अग्निशस्त्र आणि 21 काडतुसे हस्तगत करण्यात आली होती. पोलिसांनी जेनीबाईकडून शस्त्र विकत घेतलेल्या दोन तरुणांना अटक केली असून यामध्ये एका सराईताचा समावेश आहे.
संदेश अंकुश जाधव (वय 24, रा. निगडी) आणि विजय अशोक ठोसर (वय 28, रा. अजंठानगर, निगडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील जाधव याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. जेनीबाई ताना बारेला (वय 50, रा. उमेटी, बलवाडी, बडवानी, मध्यप्रदेश) हिला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस हवालदार शैलेश जगताप यांच्या माहितीवरुन जेरबंद करण्यात आले होते. लष्कर भागात पकडल्या गेलेल्या जेनीबाईकडून त्यावेळी तीन अग्निशस्त्रांसह 21 काडतुसे जप्त करण्यात आली होती. दरम्यान, जेनीबाई आॅगस्ट महिन्यात दोन वेळा पुण्यात येऊन गेल्याचे आणि तिने ही जाधव व ठोसर या दोघांना शस्त्र विकल्याची माहिती पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस हवालदार शैलेश जगताप यांना खब-यामार्फत जाधव आणि ठोसर अजंठानगरमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार, पोलिसांनी अजंठानगरमधील टीसीआय ट्रान्सपोर्टजवळ सापळा लावून जाधवला आणि चव्हाण ढाब्याजवळून ठोसरला जेरबंद केले. जाधवकडून एक पिस्तूल आणि 2 काडतुसे तर ठोसरकडून एक पिस्तूल आणि 5 काडतुसे जप्त करण्यात आली. या दोघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाई सोबत शैलेश जगताप यांनी जप्त केलेल्या बेकायदा शस्त्रांचा आकडा 157 वर गेला आहे. ही कारवाई अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.