कर्जत : वर्षा सहलीसाठी सर्वाधिक पसंती मिळत असलेल्या कर्जत तालुक्यातील सोलनपाडा धरणात मुंबईमधील दोन तरुण बुडाले. हे दोन्ही तरुण वेगवेगळ्या भागांत बुडाले. एका तरुणाचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. रविवारी पावसाने काहीशी उघडीप घेतल्याने, वर्षा सहलीसाठी आलेले पर्यटक धरणाच्या मुख्य जलाशयात उतरण्याचा प्रयत्न करीत होते. सोलनपाडा ग्रामस्थ आणि टेंबरे ग्रामपंचायत यांनी मद्यधुंद पर्यटकांना धोक्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करीत होते. सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई, जोगेश्वरी येथील विनोद रेड्डी (१९) हा तरुण धरणाच्या मुख्य बांधावरून जलाशयात खाली उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज चुकल्याने बुडाला. तर धरणातील अतिरिक्त पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सांडव्यात पोहताना अमित म्हात्रे (२४) हा गोरेगावचा तरुण धरणाच्या मुख्य जलाशयात पडला आणि बुडाला. विनोद रेड्डी याचा मृतदेह सोमवारी सापडला. (प्रतिनिधी) >पर्यटकांना बंदीसोलनपाडा धरण येथे रविवारी सुमारे २० हजार पर्यटक आले होते, शिवाय परिसरात मोठी वाहतूक कोंडीही झाली होती. पर्यटक बुडाल्यानंतर धरण क्षेत्रात पर्यटकांना बंदी घालण्यासाठी वरिष्ठ कार्यालयापासून पोलीस विभागाने जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यानुसार, सोलनपाडा धरणावर पर्यटकांना ३ महिन्यांसाठी बंदी घालण्यात येत आहे, असे कर्जतचे तहसीलदार रवींद्र बाहवस्कर यांनी सांगितले.
मुंबईचे दोघे सोलनपाडा धरणात बुडाले
By admin | Published: July 19, 2016 5:36 AM