शीतलकुमार कांबळे
सोलापूर : वाढते शहर व होणारे प्रदूषण यांचे प्रमाण पाहता शहरात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी नवीन दोन केंद्रे होणार आहेत. दोन ठिकाणी ही नवीन केंद्रे उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्लीन एयर मिशन-२०२०च्या अंतर्गत ही दोन केंदे्र उभारण्यात येणार आहेत.
शहरात दोन ठिकाणी बसविण्यात येणाºया या केंद्रांमध्ये ‘सीएएक्यूएमए’स (कन्टिन्युअस अॅम्बीएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशन) ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. या केंद्रांकडून मिळणारी माहिती ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जाणार आहे. तसेच सामान्य नागरिकांना देखील याची माहिती मिळण्यासाठी उपयोग होणार आहे. या केंद्रांद्वारे मिळणाºया माहितीच्या आधारे प्रदूषण किती प्रमाणात आहे हे स्पष्ट होते. यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी कोणती पावले उचलावीत हे ठरविता येणार आहे. २० फूट बाय १५ फूट(२० बाय १२ फूट) जागेवर प्रदूषण मोजण्याची केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडून देशात सर्वाधिक प्रदूषण करणाºया १०० शहरांची निवड करण्यात आली होती. यात सोलापूर शहराचा देखील समावेश आहे. देशातील या १०० शहरांमध्ये क्लीन एयर योजना राबविण्यात येत असून, या अंतर्गत हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी नवीन केंद्रांची उभारणी करण्यात येत आहे. पुढील तीन वर्षांत ३५ टक्के तर पुढील पाच वर्षांत ५० टक्के प्रदूषण कमी करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
सीएएक्यूएमएस म्हणजे काय ?- कन्टिन्युअस अॅम्बीएंट एयर क्वालिटी मॉनिटरिंग सिस्टीम ही एक यंत्रणा आहे. याच्या वापरामुळे हवेत असणारे पीएम २.५, पीएम १०, सल्फर डायआॅक्साईड, आॅक्साईड आॅफ नायट्रोजन, कार्बन मोनोक्साईड, ओझोन, अमोनिया यांच्या प्रमाणाची माहिती मिळते. तसेच प्रत्येक क्षणात हवेत कोणते बदल होतात, याची माहिती देखील दर्शविली जाते. सध्या शहरात हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रे ही सात रस्ता येथील चितळे रुग्णालय तसेच अशोक चौक परिसरातील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात बसविण्यात आली आहेत. या नवीन केंद्रांमुळे शहराच्या इतर भागातील प्रदूषणाचे प्रमाण समजणार आहे.
शहरात कुठे उभारणार नवीन केंद्रे?- राज्यात ४१ ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी नवीन केंदे्र उभारण्यात येणार असून, सोलापुरात दोन केंद्रे असणार आहेत. यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयाकडून दोन जागांची निवड करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोरील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जुळे सोलापूर परिसरातील पाण्याची टाकी (पोलीस चौकीजवळ) या परिसरात ही नवीन केंद्रे उभारण्याची परवानगी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिकेकडे मागितली आहे. काही दिवसांत यावर कार्यवाही होऊन स्थळे निश्चित केली जाणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष सीएएक्यूएमएस यंत्रणेच्या उभारणीस सुरुवात होईल.