- अजय पाटील
जळगाव : जिल्ह्याला लाभलेल्या सातपुड्यात अनेक दुर्मीळ प्रजातींचा शोध आतापर्यंत लागला असून, आता नव्याने सातपुड्यात बुथिडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील विंचवाच्या नवीन प्रजातींची नोंद झाली आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले व अक्षय खांडेकर तीन वन्यजीवांसाठी काम करणाऱ्या संशोधकांनी ही नोंद केली असून, महाराष्ट्रात या प्रजातीची ही पहिलीच नोंद आहे. यामुळे सातपुड्याचे महत्व पुन्हा एकदा नव्याने अधोरेखित झाले आहे.
ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनचे संशोधक विवेक वाघे हे जळगाव जिल्ह्यातील पिंपळगाव हरेश्वर या गावाचे आहेत. तर सत्पाल गंगलमाले हे मुळ सोलापुरचे असून, अक्षय खांडेकर हे सांगली येथील असून, तिन्ही संशोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र तेजस ठाकरे यांच्या ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमार्फत दुर्मीळ प्रजातींचा शोध घेवून, त्या प्रजातींच्या संरक्षणासाठी काम करतात.
सातपुडा पर्वतावरून देण्यात आले विंचवांना नवीन नावनवीन प्रजातीं ही बुथिडी कुळातल्या कॉमसोबुथस या जातीमधील आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल वनक्षेत्रालगत असलेल्या वाघझिरा व खिरोदा या गावात ही प्रजाती आढळून आली आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण ‘कॉमसोबुथस सातपुराएनसीस’ असे करण्यात आल्याची माहिती विवेक वाघे यांनी दिली. जगभरात कॉमसोबुथस या जातीच्या ५० प्रजाती आढळून आल्या आहेत. या प्रजातीची भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहीलीच नोंद आहे.
काय आहेत वैशिष्टये?१) या प्रजातीच्या विंचवाचा रंग, शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दाणेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते.२) नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते. अमेरिकेतील युस्कोर्पिअस संशोधन पत्रिकेत झाली नोंदऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती वेगळी असल्याचे लक्षात आले. त्यासंबंधीच्या संशोधनाची तज्ज्ञांकडून पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या ‘युस्कोर्पिअस’ या संशोधन पत्रिकेतून २४ फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आला. या संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले, अक्षय खांडेकर या संशोधकांचा समावेश आहे. या शोधामुळे भारतात अजूनही विंचु आणि एकूणच पर्यावरणीय संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते अशी प्रतिक्रिया या तिन्ही संशोधकांनी ‘लोकमत’ ला दिली.