लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘इमोशनल इंटेलिजन्स अॅण्ड ह्युमन रिलेशन्स’ आणि ‘मास्टर्स इन इमोशनल इंटेलिजन्स अॅण्ड लाइफ कोचिंग’ हे दोन नवे व्यवसायाभिमुख मास्टर डीग्री अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठात २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहेत. या अभ्यासक्रमांनंतर १०० टक्के रोजगाराची हमीही मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.देशमुख म्हणाले की, एका खासगी शैक्षणिक संस्थेसोबत संयुक्त विद्यमाने देशात प्रथमच या नव्या व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाची सुरुवात होत आहे. याआधी हार्वर्ड व आॅक्सफर्ड या विश्वविद्यालयांत हे कोर्सेस सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये ते सुरू होतील. संबंधित कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया जुलै महिन्यात सुरू होणार असून, आॅगस्टमध्ये नियमित वर्ग सुरू होतील. देशात अशा प्रकारचे सुरू होणारे हे पहिलेच कोर्सेस असले, तरी उद्योगजगताशी चर्चा केल्यानंतरच या कोर्सेसची आखणी केलेली आहे. चार सत्रांमध्ये पार पडणाऱ्या या अभ्यासक्रमांचा कालावधी प्रत्येकी दोन वर्षे चालेल. प्रवेशासाठी समूह चर्चा आणि वैयक्तिक मुलाखतीची प्रक्रिया पार करावी लागेल. यंदा प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ४० विद्यार्थ्यांप्रमाणे एकूण ८० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. कोणत्याही अभ्यासक्रमातील पदवीधारक या कोर्सेससाठी अर्ज करू शकतात. या अभ्यासक्रमांमुळे उत्पादन, माहिती व तंत्रज्ञान, किरकोळ, सल्लागार, पाहुणचार, बँकिंग आणि शिक्षण या क्षेत्रांत विविध विभागांमध्ये करियरच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
विद्यापीठात दोन नवे व्यवसायाभिमुख मास्टर डीग्री अभ्यासक्रम
By admin | Published: June 09, 2017 5:35 AM