भंडारा : देशाला हादरवून टाकणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील अकरा नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी दोन अधिपरिचारिकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा गुरुवारी उशिरा रात्री भंडारा ठाण्यात दाखल करण्यात आला. दोन्ही परिचारिकांनी अटकपूर्व जामिनासाठी भंडारा जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्यावर २२ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तब्बल ४० दिवसांनंतर या प्रकरणात पोलीस कारवाई झाली. यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सकांसह सात जणांवर निलंबन, सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली होती. स्मिता संजयकुमार आंबिलढुके (३४, रा. ग्रामसेवक कॉलनी, खात रोड, भंडारा) आणि शुभांगी यादवराव साठवणे (३२, रा. सिव्हिल लाइन, राजगोपालाचारी वॉर्ड, भंडारा) अशी गुन्हे दाखल झालेल्या अधिपरिचारिकांची नावे आहेत. २१ जानेवारी रोजीच या दोघींचीही सेवा शासनाने समाप्त केली होती. साकोली उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण शिवाजी वायकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून भंडारा ठाण्यात भादंवि कलम ३०४ (पार्ट २) आणि ३४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भंडारा उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील करीत आहेत.
अहवाल प्राप्त- अग्निकांडाचा न्यायवैद्यक अहवाल (फॉरेन्सिक रिपोर्ट) पोलिसांना प्राप्त झाला आहे. याबाबत पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. - प्रकरण चौकशीत असल्याने अहवालात नेमके काय आहे हे सांगता येणार नाही, असेही ते म्हणाले.