मुंबई, दि. 8 - फॅशन डिझायनर महिलेचा पाठलाग करुन रात्री दोन वाजता तिच्या घराची बेल वाजवणा-याला सोमवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. महिलेचा पाठलाग करुन तिच्या घरापर्यंत पोहोचलेला आरोपी महिलेच्या इमारतीबाहेर बराचवेळ थांबला होता. आदिती नागपाल असे तक्रारदार महिलेचे नाव असून, ती लोखंडवालामधील शास्त्रीनगर या पॉश वस्तीत रहाते.
आदिती तिच्या दोन मुलांसह कारमधून घरी परतत असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास वीरा देसाई रोडवर ही घटना घडली. नितेशकुमार शर्मा (36) असे आरोपीचे नाव आहे. नितीश कुमारने जवळपास 45 मिनिटे आदिती नागपाल यांचा पाठलाग केला. इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेजवरुन नितेशकुमार शर्मा बराचवेळ इमारतीबाहेर थांबल्याचे स्पष्ट झाले.
आदित नागपाल यांनी घडलेल्या प्रकाराबाबत इतरांना सतर्क केल्यानंतर शर्मा तिथून निघून गेला अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत गायकवाड यांनी दिली. त्याच्या डोळयात कुठलेही भय नव्हते असे आदिती यांनी सांगितले. आदितीने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन घडल्या प्रकाराची माहिती दिली आहे.
नागपाल यांनी आंबोली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. 354 कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री शर्माला अटक केली. मुंबईला महिलांसाठी सुरक्षित शहर समजले जाते. पण महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत चालली आहे. 30 नोव्हेंबर 2016 पर्यंत महिला विनयभंगाच्या कलम 354 आणि 509 अंतर्गत 2393 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
शुक्रवारी चंदीगडमधील सेक्टर 9 येथून जात असताना वर्णिका कुंडू या मुलीचा दोन जणांनी पाठलाग करून तिच्यासोबत छेडछाड केल्याची घटना घडली होती. हरियाणा भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याने हा सगळा प्रकार केला होता. वर्णिका ही हरिणायाच्या आयएएस अधिका-याची मुलगी आहे. या प्रकरणी वर्णिका कुंडू हीने या संपूर्ण घटनेवर उत्तर दिलं आहे. वर्णिकाला तिच्यासोबत घडलेली घटना सगळ्यांना सांगायची आहे. छेडछाड प्रकरणातील पीडित मुली अनेकदा त्यांची ओळख लपवतात पण वर्णिकाला तिची ओळख लपवायची नाही. घडलेल्या घटनेला जराही घाबरलr नसल्याचं वर्णिलाला या प्रकरणातील गुन्हेगारांना दाखवून द्यायचं आहे.
मी माझी ओळखं का लपवू जर मी या घटनेतून वाचलेली मुलगी आहे, घटनेतील गुन्हेगार नाही. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत वर्णिकाने तिचं मत मांडलं आहे. चंदीगडच्या रस्त्यावर 25 मिनिटं माझा पाठलाग केल्यानंतर त्या दोघांनी पोलिसांसमोर माझी माफी मागितली आणि मी तक्रार करू नये यासाठी मला विनंती केली. पण या संपूर्ण प्रकरणात त्या दोघांना पाठिशी न घालता मी तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला, असं वर्णिकाने सांगितलं.