- लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांचे नाव सांगून राज्यभरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या गणेश पाटील बोरसे याला क्रांतीचौक पोलिसांनी एका व्यापाऱ्यास गंडविल्याप्रकरणी अटक केली. त्याच्या विरोधात शुक्रवारी रात्री सिटीचौक आणि वाळूज पोलीस ठाण्यांत देखील फसवणुकीचे आणखी दोन गुन्हे नोंदविण्यात आले. बोरसेविरोधात २४ तासांत दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या तीन झाली आहे.रावसाहेब दानवे यांचा जवळचा नातेवाईक असून, त्यांचा पी.ए. आहे, असे सांगून गणेश बोरसे (४६) याने राज्यभरातील अनेकांकडून कोट्यवधी रुपये उकळले. याविषयीच्या तक्रारी आल्यानंतर खुद्द खा. दानवे त्याचा शोध घेत होते. परभणी येथील प्रमोद वाकोडकर या व्यापाऱ्यास बोरसेने १ लाख रुपयांस फसविल्याची तक्रार गुरुवारी रात्री नोंदविल्यानंतर बोरसेला मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली.विकास वसंतराव कुलकर्णी (४६) या भाजपा कार्यकर्त्यांकडून बोरसेने दोन लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. विकास यांचा मित्र गणेश कोंडीबा दांगोडे (रा.वानेगाव) यास नोकरीची गरज होती आणि त्यासाठी बोरसेने दहा लाख रुपयांची मागणी केली. मैत्रीखातर विकास यांनी अॅडव्हान्स म्हणून दोन लाख रुपये दिले. त्यानंतर विकास यांनी याचा पाठपुरावा सुरू केल्यावर बोरसे उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास पोलिसांनी पकडल्याचे समजताच कुलकर्णी यांनी वाळूज पोलिसांत धाव घेतली.तर, पैठण एमआयडीसीमध्ये प्लॉट मिळवून देण्याच्या नावाखाली बोरसे याने एका व्यावसायिकाकडून अडीच लाख उकळल्याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला. श्रीनिवास श्रीपाद कुलकर्णी असे तक्रारदार यांचे नाव असून तेही भाजपा कार्यकर्ते आहेत. श्रीनिवास यांनी सिटीचौक ठाण्यात १९ मे रोजी आरोपीविरोधात तक्रार नोंदविली.बोरसेच्या घराची पोलिसांकडून झडतीगणेश बोरसे याच्या जालना जिल्ह्यातील करजगाव येथील घराची औरंगाबाद पोलिसांनी शनिवारी झडती घेतली. या प्रकरणी पोलिसांच्या रडावर असलेले काही संशयित फरार झाले आहेत. पोलिसांना त्याच्या घरात काही शैक्षणिक कादगपत्रे, लेटर पॅड व अन्य दस्तावेज सापडले. यामध्ये बोरसेच्या संपर्कात असणाऱ्या काहींची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही जणांचा समावेश असण्याची शक्यता असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.