ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. 5 - जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यात सेनगाव तालुक्यातील जांब आंध येथे वीज पडून दोन ठार, दोन जखमी तर औंढा तालुक्यात भोसी शिवारात तीन जखमी झाले आहेत.
सेनगाव तालुक्यातील जांब आंध परिसरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाºयासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यात जांब आंध शिवारात बाबूराव धरणे यांच्या शेतात भूईमुगाच्या शेंगा काढण्यासाठी गेलेले चौघे जण झाडाखाली शेंगा खात बसले होते. त्यात पावसाला प्रारंभ झाल्यानंतर काही वेळात वीज कोसळली. तुकाराम रामजी चवरे (१८), सुनील बबन धरणे (१८), बाबूराव बबन धरणे (३0), ज्ञानेश्वर रामजी चवरे (२१) हे चौघे जखमी झाले. या जखमींवर सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. त्यानंतर त्यांना हिंगोलीला पाठविले. हिंगोली येथे नेत असताना तुकाराम चवरे व सुनील धरणे या दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
वीज पडून तिघे जखमी-
औंढा नागनाथ :तालुक्यातील भोसी शिवारात अंगावर वीज कोसळून तीघे जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी ४ वा घडली आहे.
भोसी शिवारात दुपारी अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी शेतातील एका झोपडीमध्ये बसले. त्या झोपडीजवळ वीज कोसळल्याने तिघेही भाजले गेले. त्यात ते गंभीर जखमी झाले. जखमी रत्नाबाई झाटे (५५), शंकर झाटे (६१) दोघे रा. भोसी व परसराम असोले (वय-६५ रा. जांभरून) यांच्यावर येथील नांदेड येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.