अकोला : कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण देऊन शेतकर्यांना जोडधंद्यासाठी प्रोत्साहन मिळावे, यादृष्टीने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत विदर्भातील नागपूर आणि अकोला या दोन जिल्हय़ांमध्ये कुक्कुट पालन प्रशिक्षण केंद्रं सुरू होणार असून, या केंद्रांना शासनाची मान्यताही मिळाली आहे.शेतकरी आत्महत्या सत्रानंतर विदर्भात शेतकरीहिताच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यातील काही यशस्वी तर काही योजनांचा बोजवारा उडाला असला तरी, अलिकडच्या काही वर्षांत शेतीला पुरक जोडधंद्याचे प्रमाण वाढले आहे. गायी, म्हशी, दुधाळ जनावरांचे वाटप व त्याकरिता लागणारे साहित्य वाटप वेळोवेळी करण्यात येत आहे; तथापि अलिकडे कुक्कुट पक्षांची वाढती मागणी आणि बाजारपेठ बघून राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने कुक्कुट पालन व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय सोपा आहे; परंतु कुक्कटाची पांरपरिक पद्धतीने देखभाल करण्यात येते. त्यामुळे अनेकवेळा या पक्ष्यांना आजार झाल्यास कुक्कुट पालन करणार्या व्यावसायिकास कळत नाही. यामुळे अनेकवेळा त्यांना मोठे नुकसान सोसावे लागते. म्हणूनच शेतकरी, बचत गटांना कुक्कुट पालनाचे तंत्रज्ञान प्रशिक्षणातून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी विदर्भात अकोला व नागूपर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आले असून, अकोल्यात पदव्युत्तर पशू व मत्स्य विज्ञान संस्थेचे शास्त्रज्ञ या विषयाचे तंत्रज्ञान शेतकर्यांना या प्रशिक्षण केंद्रातून देणार आहेत. नागपूर येथे महाराष्ट्र पशू विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या केंद्रामुळे प्रशिक्षित व्यावसायिक तयार होतील आणि शेतकर्यांना शेतीला पुरक जोडधंदा मिळेल.पदव्युत्तर पशू व मत्स्य विज्ञान संस्थेचे डॉ सतीश मनवर यांनी अकोला व नागपूर येथे जिल्हास्तरीय कुक्कुट पालन प्रशिक्षण केंद्र देण्यात आली असून, या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकर्यांना कुक्कुट पालनाचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे या भागात शेतकर्यांना शेतीला पुरक जोडधंदा करता येणार असल्याचे सांगीतले.
विदर्भात दोन कुक्कुट पालन प्रशिक्षण केंद्रं!
By admin | Published: October 01, 2014 11:18 PM