कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनप्रकरणाशी संबंधित खटल्यात कोल्हापुरात एक व उच्च न्यायालयात दुसरे असे दोन सरकारी वकील बाजू मांडणार आहेत. पुण्याचे ज्येष्ठ विधिज्ञ हर्षद निंबाळकर हे मुख्य खटल्यात सरकार पक्षाची बाजू मांडत आहेत. त्यामुळे त्यांनाच संशयित आरोपी समीर गायकवाड याच्या जामीन अर्जावरील दाव्यांतही नियुक्त करावे, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली होती, परंतु सरकारने त्यांच्याऐवजी अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल अनिल सिंग यांची नियुक्ती केली आहे. मेघा पानसरे यांना मुख्यमंत्री कार्यालयातून तसे सांगण्यात आले.या खटल्यात सरकार पक्षाकडून भक्कमपणे बाजू मांडली जावी, म्हणून पानसरे कुटुंबीयांनीच आग्रह धरल्यावर निंबाळकर यांची सरकारने या खटल्यात नियुक्ती केली. खुनाचा मुख्य खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सुरू आहे, त्यामध्ये ते सरकार पक्षाच्या वतीने बाजू मांडत आहेत. त्यांना या खटल्यातील बारकावे माहीत आहेत व त्यांनीच उच्च न्यायालयातही बाजू मांडली तर जास्त योग्य ठरेल, असे पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे होत, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कळविण्यात आले होते, परंतु उच्च न्यायालयातील दाव्यात अतिरिक्त अॅडव्होकेट जनरल अनिल सिंग हे बाजू मांडतील, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कळविण्यात आले आहे. या खटल्यातील मुख्य संशयित आरोपी समीर गायकवाड याला लवकर जामीन मिळावा, अशी मागणी करणारा हा खटला आहे. सनातन संस्थेच्या वतीने अॅड. संजीव पुनाळकर यांनी ती याचिका दाखल केली आहे. (प्रतिनिधी)
पानसरे खटल्यात दोन सरकारी वकील
By admin | Published: April 21, 2016 5:09 AM