पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेच्या दोन संशयित साधकांची पॉलीग्राफ चाचणी करण्यास पुण्यातील न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) परवानगी दिली आहे.हेमंत शिंदे (रा. २६३, बी/८, योगिनी अपार्टमेंट, शिवाजीनगर गावठाण, पुणे) आणि नीलेश शिंदे (रा. मंगळवार पेठ, पुणे) यांची नवी मुंबईतील सीबीडी-बेलापूर येथील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये (सीएसएफएल) ही चाचणी होईल. डॉ. दाभोलकर यांची २० आॅगस्ट २०१३ रोजी बालगंधर्व रंगमंदिराजवळील पुलावर गोळ््या झाडून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या तपासासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली. मात्र, गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास २ जून २०१४ रोजी सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. तेव्हापासून सीबीआयने हेमंत व नीलेश यांच्यासह अनेकांचे जबाब नोंदविले आहेत. मात्र, हेमंत व नीलेशने सीबीआयला समाधानकारक माहिती दिली नाही. सीबीआयकडील माहिती व त्यांनी दिलेल्या जबाबामध्ये तफावत असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. सीबीआयचे (मुंबई) अतिरिक्त अधीक्षक एस. आर. सिंग यांनी १० फेब्रुवारीला दोघांच्या पॉलीगॉफी चाचणीसाठी परवानगी मिळण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शीतल बांगड यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यापूर्वी दोघांनीही पॉलीग्राफ चाचणी करण्यास सीबीआयला संमती दिली होती. सीबीआयने तसे न्यायालयात दिलेल्या अर्जातही नमूद केले होते. त्यानुसार न्यायालयाने दोघांना नोटीस बजावून १७ फेब्रुवारीला न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. (प्रतिनिधी)
‘सनातन’च्या दोन साधकांची होणार पॉलीग्राफ चाचणी
By admin | Published: February 18, 2016 7:04 AM