ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 16 - लातूरपासून जवळच असलेल्या हरंगुळ येथे जलयुक्त शिवारच्या नाल्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. तेजस (वय १२) आणि सौरव अंगद पन्हाळे (वय ८) अशी मयताची नावे आहेत. काल दुपारी हे घरून सायकल घेऊन बाहेर गेले होते. मात्र रात्रीपर्यंत परतले नाहीत. यामुळे शोधाशोध सुरू झाली तेव्हा हा प्रकार समोर आला. लातूर तालुक्यातील हरंगुळ येथे जलयुक्त शिवार योजनेतून मोठा नाला विकसित करण्यात आला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. १५ ऑगस्ट दिनी तेजस आणि सौरव ही मुले दुपारी तीन वाजता सायकल घेऊन गायब झाली होती. रात्र झाली तरी मुले घराकडे परत आली नाहीत म्हणून आज शोधाशोध केली असता या मुलांची सायकल या नाल्याच्या बाजूला सापडली. त्यानंतर तपास केला असता नाल्यात या दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले. यानंतर या घटनेचा उलगडा झाला. याप्रकपणी लातूरच्या एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मुलांवर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दाम्पत्याला होती ही दोनच मुले... हरंगुळ गावात मजुरी करून राहणा-या अंगद पन्हाळे यांना तेजस आणि सौरव ही दोनच अपत्य होती. दोघेही लातूरच्या सानेगुरूजी विद्यालयात शिकत होते. तेजस सहावीला तर सौरव तिसरीला शिकत होता. घरावर पडलेल्या या काळाच्या घालाने पन्हाळे पती पत्नीला शोक अनावर झाला होता.
जलयुक्त शिवारच्या ओढ्यात बुडून दोन शाळकरी भावांचा मृत्यू
By admin | Published: August 16, 2016 4:39 PM