ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मध्य रेल्वेवरील वाहतुकीत होणारा अडथळा दूर करण्यासाठी ठाकुर्ली येथे पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. सोबत अंबरनाथ-बदलापूरमधील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी रविवार ( २५ जून) मध्य रेल्वेतर्फे दोन विशेष ब्लॉक घेतले जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील सेवा किमान सहा तासांसाठी बंद ठेवली जाणार आहे.
या पुलासाठी चार गर्डर बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी डोंबिवली आणि कल्याण मार्गावरील सर्व सहा मार्गिकांवर ब्लॉक चालणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी रविवारी ब्लॉकच्या वेळापत्रकाचा अंदाज घेत प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
या कामामुळे लोकलप्रमाणेच मेल/एक्स्प्रेस सेवांवर परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेच्या नियमित ब्लॉकसह गर्डरच्या कामासाठीही ब्लॉक घेण्यात येणार आहे.
कुठे आहे मेगाब्लॉक?
पहिला ब्लॉक
अप आणि डाउन मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत.
अप आणि डाउन फास्ट मार्गावर स. ९.१५ ते दु. १२.४५ आणि पाचव्या व सहाव्या मार्गिकेवर स. ९.१५ ते दु. ३.१५ पर्यंत.
दुसरा ब्लॉक
अंबरनाथ आणि बदलापूर येथील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. या दोन्ही स्थानकांमध्ये असलेल्या पुलास आरसीसीचा भक्कम आधार दिला जाणार आहे. त्यासाठी अंबरनाथ आणि वांगणीमध्ये अप आणि डाउन मार्गावर स. ९.३० ते दु. २ पर्यंत ब्लॉक चालेल.
लोकल सेवांवर परिणाम
कल्याण आणि डोंबिवलीमध्ये स. ९.१० ते दु. १२.५० पर्यंत अप-डाउन फास्ट आणि अप-डाउन स्लो मार्गावर स. ९.१० ते दु. ३.२० पर्यंत सेवा बंद राहणार आहे.
ठाकुर्ली स्थानकावरून स. ९ ते दु. ३.३० पर्यंत दोन्ही दिशेने सेवा उपलब्ध नसतील.
डाउन फास्ट मार्गावर दु. १२ पासून सीएसटी ते अंबरनाथ आणि सीएसटी ते कसारा/आसनगाव/टिटवाळा मार्गावर सेवा उपलब्ध राहतील.
अप फास्ट मार्गावर अंबरनाथ ते सीएसटी आणि कसारा/आसनगाव/टिटवाळा ते सीएसटी मार्गावर दु. १२.४५ पासून सेवा उपलब्ध होतील.
रद्द होणाऱ्या मेल/एक्स्प्रेस
पुणे-सीएसटी-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस
मनमाड-सीएसटी-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस
मनमाड-एलटीटी-मनमाड गोदावरी एक्स्प्रेस
पश्चिम रेल्वेचा रात्री ब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावर विरार ते वसईमध्ये शनिवारी रात्री १२ ते २.३० वाजेपर्यंत अप फास्ट मार्गावर, तर रात्री १.३० ते पहाटे ४ पर्यंत डाऊन फास्टवर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.