नागपूर : नैसर्गिक चमत्कार असलेल्या लोणार सरोवराच्या बाबतीत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या ऐतिहासिक सरोवराच्या परिसरातील पाचपैकी दोन झरे आटले आहेत. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळाचे संवर्धन कसे होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.लोणार सरोवर क्षति प्रतिबंध व संवर्धन समितीच्या बैठकीचे इतिवृत्त गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष सादर करण्यात आले. त्यातून ही बाब उघड झाली आहे. बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांच्या अध्यक्षतेखाली २५ फेब्रुवारी रोजी समितीची बैठक झाली. बैठकीत सरोवर परिसरातील पाचपैकी दोन झरे आटल्याची माहिती देण्यात आली. ही बाब लक्षात घेता, भूजल सर्वेक्षण विभागाकडून याचा अभ्यास करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी सुधाकर बुगदाने, कीर्ती निपाणकर व गोविंद खेकाळे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. प्रकरणावर न्यायमूर्ती भूषण गवई व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी निश्चित करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)स्थानांतरितांच्या घरांचा प्रश्न सरोवर परिसरात अतिक्रमण करून राहत असलेल्या लोकांना स्थानांतरित करण्यासाठी घरकूल योजनेला मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यातील घरांचे काम पूर्ण झाले आहे. परंतु लाभार्थी निर्धारित रक्कम जमा करून घरांचा ताबा घेण्यास तयार नाहीत. अशा लाभार्थ्यांना नोटीस देऊन त्यांचे अतिक्रमण हटविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. दुसऱ्या टप्प्यात ४०६ घरांचे काम सुरू असल्याची माहिती नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
लोणार सरोवरातील दोन झरे आटले
By admin | Published: March 31, 2017 4:26 AM