ऑनलाइन लोकमतडोंबिवली, दि. 29 - बांधकाम व्यावसायिक अमित पाटील यांचा अंगरक्षक विकी शर्माच्या हत्ये प्रकरणात तीन मारेक-यांपैकी दोन शार्पशूटरांना पकडण्यात अखेर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले आहे.नागेश सोनावळे (29, रा. आंबेडकर रोड, ठाणे) आणि अजय वर्मा अशी अटक शार्पशूटरांची नावे आहेत. यातील नागेश याला ठाणे येथून तर अजय याला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आले असून, त्यांच्याकडून एक पिस्तूल जप्त केलं आहे. यातील मुख्य मोरक्या बच्चा यादव ऊर्फ लल्लू हा अद्याप फरारी असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.बुधवारी 21 डिसेंबर रोजी दुपारी दिवसाढवळया फिल्मी स्टाईल पद्धतीने दुचाकीवरून आलेल्या मारक-यांपैकी एकाने बंदुकीतून गोळ्या झाडून बांधकाम व्यावसायिक अमित पाटील समजून त्यांचा अंगरक्षकास ठार मारून पसार झाले. या गोळीबाराच्या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून, शिवसेना आणि मनसेच्या स्थानिक नेते मंडळींनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून या हत्येच्या घटनेला राजकीय रंग दिला होता. अखेर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर, सहाय्य पोलीस निरीक्षक विजय खेडकर ,पोलीस हवालदार अशोक राणे, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिल्लरे, नरेश जोगमार्गे, विलास मालशेट्टे आणि हरिश्चंद्र बंगारा अादींनी आठ दिवस कसोशीने शोध घेऊन दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. दरम्यान ही हत्या सुपारी देऊन केल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र ही हत्या राजकीय की व्यावसायिक वादातून झाली याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.
विकी शर्माच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींपैकी दोन शार्पशूटर अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2016 9:47 PM