ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 8 - १० वी आणि १२ वीच्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर होऊन दोन आठवडे उलटले असून अद्याप उत्तीर्ण झालेल्या एकूण २२६१ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नसल्याचे जिल्ह्यात चित्र आहे. शहरांमधील महाविद्यालयांमध्ये प्रवेशाबाबत अडचणी अधिक येत असल्याची माहिती समोर आली आहे. १० वीच्या फेरपरीक्षेमध्ये ११०८ तर १२ वीच्या परीक्षेत ११५३ विद्यार्थी यशस्वी झाले. यातील १०वीमध्ये फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी जि.प.ला पत्र दिले आहे. हे पत्र मात्र पुढे विद्यालये किंवा इतर यंत्रणांकडे पाठविण्यात आलेले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.तर १२ वीमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांबाबतही जि.प.ने विद्यापीठाला पत्र दिलेले नाही. यातच विद्यापीठाने काही महाविद्यालयांना जागा वाढविण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. परंतु सध्या कुलगुरूपदाचा प्रभारी कारभार असल्याने महाविद्यालयांनी तत्कालीन कुलगुरूंच्या सूचनांचे गांभीर्याने पालन केलेले नसल्याची माहिती मिळाली.