ठाणे पोलिसांची कारवाई : दोघे गजाआड, युरोपशी कनेक्शन
ठाणे, दि.१६ - ठाणे शहर पोलिसांनी सोलापुरातील एका कंपनीतून तब्बल साडेअठरा टन इफेड्रीन पावडरचा साठा जप्त केला. ‘पार्टी ड्रग्ज’ म्हणून ओळखल्या जाणा-या या पावडरची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे दोन हजार कोटी रुपये आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून ही कंपनी देखील सील केली आहे.
गुजरात गुन्हे शाखेने जप्त केलेला सव्वाटन इफेड्रीन पावडरचा साठाही याच कंपनीतील असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकरणाचे युरोपशी कनेक्शन असण्याची शक्यता असल्याने मुंबई अंमलीपदार्थविरोधी विभागाची मदत घेण्यात येईल, अशी माहिती ठाणे शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी दिली. तसेच देशातील ही मोठी कारवाई असल्याचा दावा शहर पोलिसांनी केला आहे.
ठाणे जिल्ह्यातील डायघरमध्ये १० एप्रिलला ओकाय सिप्रेन चिन्नासा या नायजेरियन तरुणाला अर्धा किलो इफेड्रीन ड्रग्जसह कल्याण गुन्हे शाखेने पकडले होते. त्यानंतर, १२ एप्रिलला वर्तकनगरमधून मयूर सुखदरे आणि सागर पोवळे यांना दोन किलो साठ्यासह अटक केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सोलापुरात धानेश्वर राजाराम स्वामी (२८) याला अटक करून त्याच्याकडून ५ किलो ५०० ग्रॅम इफेड्रीन जप्त केले.
त्याच्या चौकशीत सोलापूरच्या चिंचोळी एमआयडीसीतील एव्हाएॅन लाइफ सायन्सेस लि.चा सीनिअर प्रॉडक्शन मॅनेजर राजेंद्र जगदंबाप्रसाद डिमरी (४८) याचे नाव समोर आल्यावर त्यालाही अटक केली. त्याच्याकडे ७ किलो ६०० ग्रॅम वजनाची इफेड्रीन सापडली. तसेच स्वामीने दिलेल्या माहितीनुसार त्याच कंपनीच्या गोडाऊनमध्ये एकूण ९.५ टन इफेड्रीन पावडरचा साठा सापडला.