ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 22 - हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर दोन हजार रुपये दराच्या नव्या नोटा चलनात आल्या. तेव्हापासून दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणाऱ्या एका रॅकेटचा शहर गुन्हेशाखा पोलिसांनी रविवारी सायंकाळी पर्दाफाश केला. या टोळीचा एक सदस्य पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्याकडून दोन हजाराच्या बनावट १८ नोटा जप्त करण्यात आल्या. दोन हजाराच्या बनावट नोटा पकडण्याची मराठवाड्यातील ही पहिलीच कारवाई आहे.महंमद इर्शाद महंमद इसाक (२७, रा. शहाबाजार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना गुन्हेशाखा पोलिसांनी सांगितले की, आरोपी घाटी रुग्णालयातील आॅपरेशन थिएटरमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तो गेल्या काही दिवसापासून दोन हजाराच्या बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. त्या माहितीच्या आधारे पोलीस त्याच्यावर पाळत ठेवून होते. रविवारी सायंकाळी सेंट्ररल जकात नाका परिसरातील फिश मार्केटमध्ये तो दोन हजाराच्या नोटा खर्च करीत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यास चोहोबाजूने घेरून पकडले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ दोन हजाराच्या एकूण १८ नोटा आढळल्या. यातील अनेक नोटांचा क्रमांक एक सारखा होता. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने या नोटा जालना जिल्ह्यातील अंबड येथील त्याच्या मित्राकडून आणल्याचे सांगितले. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून त्यास नोटा पुरविणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे.